सगळ्या जगाच्या जगण्यात बदल करून अनेक प्रश्न निर्माण करून २०२० हे वर्ष संपेल. त्याबरोबर एक दशक ही संपेल. कोणत्याही क्षणाला, दिवसाला अगदी वर्षाला सुध्दा लांबी रुंदी मिळते ती त्यावेळी आलेल्या अनुभवांच्या आधारावर!! आणि सरत्या वर्षाने कुठुनतरी निर्माण झालेल्या सुक्ष्म जीवाणूंनी निसर्गाचे अफाट सामर्थ्य आणि अहंकारी माणसाला आपल्या क्षुद्रपणाची जाणीव करून दिली आहे.
कितीतरी आपल्या जवळचे, नात्यातले, नामवंत चेहरे आपल्या आठवणीत राहून आयुष्यातुन वजा झाले आहेत. ह्या वर्षात आपण शिकलो की पैशांनी हवं ते विकत घेता येत पण आॅक्सिजन विकत घेता येत नाही आणि साधं सोपं सरळ आयुष्य जगणंच खरं जगणं आहे. सगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीतून आपण ह्या अवघड वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात आलो आहे आणि ३१डिसेंबरच्या रात्री नंतर उगवणार्या आशेच्या सोनेरी सकाळची आपण आतुरतेने वाट पहात आहोत.
३१ डिसेंबरची रात्र नेहमीच उद्या सकाळी नवं वर्ष नवा संकल्प! अशा विचारात जाते. डायटिंगसाठी आवडते आणि वजन वाढवणारे पदार्थ सोडायचे, सकाळी चालायला जायचं, डायरी लिहायला सुरुवात करायची, घरातली कामं वेळच्या वेळी रोज करायची असे अनेक संकल्प जे कमीत कमी दोन दिवस आणि जास्तीतजास्त एक महिना चालू शकतात. ह्या वर्षी मात्र सर्वसाधारण पूर्ण-अपूर्ण संकल्पांचे संदर्भच बदलून गेले आहेत.
रोजच्या धावपळीच्या जीवनात कोरोनामुळे अचानक थांबावं लागलं आणि त्या काळात जाणवलं की आपलं स्वतःसाठी जगणं राहूनच गेलं आहे!!
त्यासाठीच नवीन वर्षाच्या सुरुवातीला संकल्प करूया की स्पर्धेच्या युगात आपण आपले छंद, आवड ह्याकडे ही लक्ष देऊया.
अचानक घरकाम करणाऱ्या महिला कामाला यायच्या बंद झाल्या आणि घरातली कामं वाटून घ्यावी लागली. आता मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुलगा मुलगी असा भेद न करता प्रत्येकानं घरकाम, स्वैपाक शिकून घ्यायचा संकल्प करायलाच हवा.
ह्या काळात एकटे रहाणारे जेष्ठ नागरिक, आजारी मंडळी ह्यांना मदतीची खूप गरज भासली. ह्या वर्षात आपण अशा गरजूंना लागणारी मदत करून माणूसकीची नाती जोडणं शक्य आहे. व्यावहारिक संबंधांपलिकडे जाऊन अशी मदत केली तर आपल्या मनाला भावनिक आनंद नक्कीच मिळेल. शेवटी असे नातेसंबंध आपल्या जगण्यावरचा विश्वास दृढ करतात. तेव्हा अनोळखी असले तरी गरजू लोकांना मदत हा संकल्प नवीन वर्षासाठी होऊ शकतो.
कोरोनाच्या काळात नोकरी करणं हे सर्वात सुरक्षित असं जे समजलं जातं होतं ह्या संकल्पनेला छेद मिळाला आणि अनेक घरगुती व्यवसाय सुरू झाले. आमच्या गल्लीत दोन इंजिनिअर मुलं सकाळच्या वेळ ताजी फळं, भाज्या विकताना दिसली. आपली आवड जाणून घेऊन एखाद्या व्यवसायाचं ज्ञान घेण्याचा संकल्प करायला काहीच हरकत नाही.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करायचा संकल्प! जगण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू म्हणजे झाड, वृक्ष आहे. ज्यांचा भरमसाठ नाश आपण केला आहे. तेव्हा सर्वांनी वृक्षारोपणाचा संकल्प करायला हवाय. कारण ह्या कमी प्रदुषण काळात सर्वांनीच पृथ्वीचे प्रेमगीत अनुभवलय. स्वच्छ नद्याचं वाहणं, प्रदुषणमुक्त हवेमुळे शहरांतून दिसणारी हिमशिखरे हे सर्व नक्कीच आनंददायी होत. तेव्हा कचर्याची योग्य व्यवस्था, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे नियम पाळणे, एखादं तरी झाड लावायचं, ह्या अगदी साध्यासुध्या संकल्पांमुळे स्वतः आणि समाज म्हणून आपली जबाबदारी निश्चित पार पाडता येईल.
अनेक प्रकारांनी मी ३१ डिसेंबर साजरा केला आहे. मोठ्या हाॅटेलातल्या पार्ट्या बघितल्या आहेत. घरी मित्र-मैत्रिणींना बोलावून खूप धमाल केली आहे. पण ह्यावेळी मात्र कुठे तरी आयुष्यातली असुरक्षितता व्याकूळ करून जातेय. ह्या असुरक्षिततेची लढाई आपल्या सर्वांना द्यायची आहे. एकत्रित येऊन द्यायची आहे. तेव्हाच २०२१ ची सकाळ सोनेरी होईल आणि नव्या वर्षाचं स्वागत नव्या संकल्पानी करता येईल.
मार्गशीर्ष पौर्णिमा
ता. २९.१२.२०२०
ललिता छेडा