Friday, October 30, 2020

पारंपरिक ते काॅन्टिनेंटल

       १६ आॅक्टोबरचा 'जागतिक अन्न दिन' साजरा करताना अन्नाची गरज रोजच्या जगण्यात किती आहे ते ह्या वर्षी आलेल्या अनेक प्रसंगांतून कळलं. 

       लाॅकडाऊनच्या सुरवातीच्या काळात अनेक श्रमिक, गरीब, कुटुंबांना एकवेळच्या जेवणापासून वंचित रहावं लागलं. स्थलांतरित, हातावर पोट असलेल्यांना अक्षरश "अन्नासाठी दाही दिशा" कराव्या लागल्या. अशावेळी अनेक महिलांनी, काही संस्थांनी पुढाकार घेऊन ह्या मंडळींच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली होती. ह्याकाळाच्या सुरवातीला घरातून बाहेर न पडता आल्यामुळे अनेक एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ मंडळींचे पण खाण्यापिण्याचे हाल झाले.
       दुसरं महत्त्वाचं म्हणजे सध्या आलेलं आजारपण संसर्गजन्य असल्यामुळे घरकाम करणाऱ्या महिला कामाला यायच्या बंद झाल्या आणि घरातली सगळीच मंडळी घरकाम करायला लागली. त्यामुळे स्वैपाक आणि स्वच्छता ह्याबाबतीतला‌ घरातल्या प्रत्येकाचा सहभाग अनिवार्य झाला आणि मग सूरू झाली पारंपरिक ते काॅन्टिनेंटल पदार्थांची रेलचेल! जोडीला what's app आणि Google search होतंच. नातवंड आजीच्या मदतीनं पारंपरिक पदार्थ शिकत होती तर परदेशातल्या केक, पास्ता, पिझ्झाचं इंडियन वर्जन घरात पोळ्यांना पर्याय म्हणून आवडायला लागलं. काही मंडळींनी आयतं मिळताय ते काहीही मदत न करता एन्जाॅयही केलं.
      खरं म्हणजे ह्या परिस्थितीनं प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारातले बदल, हळदीच्या दुधाची गरज हे सगळं 'उदर भरण नोहे'...हे खर्‍या अर्थानं शिकवलं.
      पारंपरिक पदार्थांची आठवण म्हटलं की प्रत्येकालाच आपल्या लहानपणीचे आई, आजीच्या हाताची चव असलेले पदार्थ आठवतात. मला तर त्या पदार्थांबरोबर उष्ट-खरकट, सोवळं-ओवळं, वाढतांना डाव्या-उजव्या बाजूचे पदार्थ ह्या शब्दांची शिकवण आणि शिस्त मनांत येते.
      आईची अजून एक आठवण म्हणजे प्रत्येक पदार्थ प्रमाणात व्हायला हवा हा तिचा अट्टाहास! तिचं म्हणणं असायचं" खिचडी कशी मऊ- मोकळी व्हायला हवी, श्रीखंड कसं योग्य प्रमाणात आंबटगोड हवं, जिलबीचा खुटखुटीतपणा (जिलब्या ती नेहमी घरीच करत असे) मोदकांच्या बाहेरच्या पारीचा तलमपणा, हलव्यावरचा काटा कसा एक सारखा हवा, सगळं कसं अगदी उत्तम हवं!! आता मनांत येतं पारंपरिक पदार्थांच्या अशा प्रमाणबद्धतेमुळेच त्या काळच्या स्त्रीयांना आयुष्याचा समतोल राखायला छान जमलं होतं.
       हल्ली 'काॅन्टिनेन्टल फुड' तर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. काॅन्टिनेन्टल खरं म्हणजे 'युरोपियन' फुड! जे बिना तेलाचं, बिना मसाल्याचं लंच-डिनरला किंवा कधी कधी तर नुसत्या उकडलेल्या भाज्या असतात तेच जेवण! पण आपण भारतीयांनी मात्र जसं चायनीज पदार्थांना इंडियन चायनीज बनवलं तसंच ह्या उकडलेल्या भाज्या वेगवेगळ्या मसाल्यांनी स्वादिष्ट केल्या.
       आम्ही इटलीला पिझ्झा ‌खाल्ला त्याची चव खूप छान आणि वेगळी होती. ज्या गावचा जो पदार्थ प्रसिद्ध असतो तो तिथंच खायची खरी गंमत आहे. अमेरिकेत जाणवलेलं वैशिष्ट्यं म्हणजे तिथले पदार्थ चीज, बटर शिवाय पूर्णच होत नाहीत.
       तरीसुद्धा पारंपरिक महाराष्ट्रीयन नेवैद्याचं ताट ज्यात वरणभात, मसालेभात, वर तुपाची धार, पक्वान्न, डाव्या बाजूला चटणी, कोशिंबीर, लिंबाची फोड, उजव्या बाजूला भाज्या, वाटीत अळूची भाजी ह्याची बरोबरी कशाशीच होऊ शकत नाही. तसंच दाक्षिणात्यांच्या इडली डोशाबरोबर केळीच्या पानावरचा गरमागरम सांबार भात, अवियल, खीर बघून कसं प्रसन्न वाटतं!‌ तर सजलेल्या गुजराथी थाळीतल्या ५-६ वाट्यांमधली तोंडीलावणी, ढोकळा, भजी, दोन तरी मिष्टान्नं मन तृप्त करतात आणि तिकडे उत्तरेला पंजाबी समोसा, परोठा, आलू मटार आणि मोठा ग्लास लस्सी ह्या सर्वांची मजाच काही और!! आणि दही तर सर्वत्र हवंच. असा हा आपला भारत विविधतेने नटलेल्या पदार्थांमुळे एकेमेकांशी अन्नामुळे जोडलेला आहे.
       सामिष आहार करणार्‍यांवर तर एक वेगळा लेखच लिहावा लागेल.
       पण जागतिक अन्न दिनाला खरी आठवण केली पाहिजे शेतकऱ्यांची!! ज्यांचं ह्या वर्षी कोरोनाबरोबर महापूर, परतीच्या पावसामुळे झालेलं नुकसान ह्यामुळे जे हाल झाले आहेत. ते शब्दात व्यक्त करायचे तर...
          निसर्ग हा कोपला भारी, धान्याची धुळधाण करी।
          भाजीपाला सडला तरी, त्यासी कोणी मदत न करी।
          बळीराजाच्या श्र्वासाची किंमत‌ आहे काय तरी?
      कृषीप्रधान म्हणवल्या जाणाऱ्या आपल्या देशाची ही खूप मोठी शोकांतिका आहे. तेव्हा पारंपरिक असेल किंवा काॅन्टीनेन्टल...पुढ्यात आलेल्या अन्नामागच्या कष्टांची जाणीव प्रत्येकानं ठेवून वागलं पाहिजे.

      भुकेल्या पोटी स्वप्न बघत अनेक 
      गरीब मुलं झोपी जातात।
      तेव्हा अन्नाची नासाडी टाळूया।
      जगण्यासाठी आवश्यक तेवढंच खाऊया।
      कारण अन्न कमवायला ही आपण 
      धावतोय आणि ते पचवायला ही आपण धावतोय हे            लक्षात असुद्या।


                              अश्र्विन पौर्णिमा
                             ता. ३०.१०.२०२०
                                 ललिता छेडा


Saturday, October 17, 2020

प्रेरणादायी अश्र्विन

      अश्र्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूच आगमन होतं आणि शारदीय नवरात्रौत्सवाची चाहूल लागते. आपल्याला मात्र बाजारात झेंडू, शेवंती, अॅस्टरची फुलं दिसू‌ लागली की नवरात्रीचे नऊरंग, घरोघरी होणारें आदिमाया आदिशक्तीचं पूजन, अखंड दीप ह्या सगळ्यांबरोबर भोंडल्याची, गरब्याची गाणी मनात रुंजी घालू लागतात.

      मी मात्र ह्या नवरात्रीच्या निमित्ताने माझ्या आयुष्यातल्या नव दुर्गांच्या आठवणींची ओंजळ रिकामी करायची ठरवलीय. 

             त्यात सर्वात पहिली "माझी आई"...
      शाळेत असताना आपण सर्वांनीच आपल्या आईवर निबंध लिहीलाय. त्या निबंधाचा तकलादूपण आपण आई झाल्यावर कळतो आणि हसू देखील येतं पण खरी आई कळते आपल्या आयुष्यातुन ती निघून गेल्यावर आणि संपूर्ण उलगडते आपण तिच्या वयाचे झाल्यावर!
       माझा आईचं माहेरच नांव 'शांता' आणि सासरचं 'सुमती'. दोन्ही नांव सार्थ ठरवणारा तिचा स्वभाव होता. सतत कामं करत रहाणं हे तिचं पॅशन (मराठी शब्द 'आवड') होतं. तिनं एका सुईवर जवळ जवळ तीन वर्षं सतत विणून सुंदर मोठी चादर विणलीय.‌ त्यात तिचं नांव, कलात्मक चित्रं हे सगळं तिनं स्वत: तयार केलंय! ती चादर माझ्यासाठी तिची सुंदर आठवण आहे. म्हणूनच मी पॅशन म्हटलं, अगदी शेवटपर्यंत ती काही जमत नव्हतं तर वाती आणि गव्हले करत असायची.
       तिचा दुसरा आनंद म्हणजे 'माणसं!! लहानथोर, गरीब-श्रीमंत कोणाशीही तिचं सहज जमून जायचं आणि‌ जुळलेलं नातं ती जिवापाड जपायची. ती सुगरण होतीच पण सर्वांना खायला करून घालणं हे पण तिच्या आवडीचं काम होतं. "मामींनी ऐनवेळी करून घातलेल्या पिठलं-भाताची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय! असं म्हणणारी अनेकजण अजूनही‌ तसं सांगतात. सर्वांचे वाढदिवस तिच्या लक्षात असायचे आणि ती आवर्जून त्या व्यक्तीला भेटीबरोबर दोन ओळींची कविताही करून द्यायची. सासर-माहेर कोणाच्या कडच्याही लग्न-मुंजीत ती सगळी जबाबदारी आवडीनं उचलायची आणि मनापासून सर्व पार पाडायची.
       आमच्या परळच्या घरच्या माझ्या लहानपणीच्या अनेक आठवणीत सतत नातेवाईकांचं येणं-जाणं, परळ भगिनी मंडळ, दामोदर हॉल मधली नाटकं हे सगळं आहेच. त्यातसुद्धा दादांचा (माझे वडील) तापट स्वभाव! पण आज मागे वळून बघताना आईनं किती सोशिकपणे हे सगळं निगुतीने सांभाळून नेलं त्याची जाणीव होते.
‌ ‌ ‌      माझं लग्न तिच्या मनाविरुद्ध झालं आणि तिची कोणतीच हौस झाली नाही म्हणून ती थोडी खट्टू झाली. पण नंतर माझं डोहाळजेवण, माझ्या लेकीच बारस तिनं थाटामाटात साजरं केलं आणि सगळी हौस पूर्ण करून घेतली!! आहे त्यात समाधानी असणं तिची खासियत होती.
       आईच्या माझ्या मनात असलेल्या आठवणी न संपणाऱ्या आहेत. त्यांना इतक्या थोड्या शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. पण सुगरण म्हणजे आई...कामसू म्हणजे आई....सोशिक म्हणजे आई... नातं जपणारी म्हणजे आई... प्रत्येक गोष्टीत कलात्मकता आणणारी‌ म्हणजे माझी आई...
             माझी दुसरी दुर्गा म्हणजे माझी आजी...
       आजी म्हणजे माझ्या आईची आई! तिचं नांव ‌सरस्वती होतं पण ती खरीखुरी दुर्गा होती. तिचा खंबीरपणा, कोणत्याही परिस्थितीला न डगमगता धीराने सामोरं जाणं, अविरत कष्ट करण्याची ताकद हे गुण माझे आदर्श आहेत. आमच्या घरातल्या प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात ती आमच्या आईचा आधार असायची. तिला भजनं म्हणायला खूप आवडायची. तिचं आवडतं भजन "कैवल्याचा‌ पुतळा प्रगटला भूतला...हे होतं.
       ती तरुणपणी विधवा झाली, दोन मुलांना घेऊन कोकणात भावाकडे रहायला आली. मुलं मोठी झाल्यावर ‌त्यांना घेऊन मुंबईत आली. माझ्या आईचं लग्न करून दिलं पण मामानं मात्र तिला कधीच सुख दिलं नाही. तिनं मात्र त्याबद्दल कधीही बाहेर चकार शब्दही काढला नाही आणि जमेल तेवढं आणि जमेल तसा मामीच्या मदतीनं संसाराचा गाडा ओढला. अनेक प्रसंगात तिचं ठामपणे उभं राहणं माझ्या आठवणीत आहे. हलवा करणं, गोधड्या करणं, उन्हाळ्यात वाळवणं घालणं अशी अनेक कामं करून ती मामीच्या मदतीनं संसाराला आर्थिक मदत करत होती.
                  माझी तिसरी दुर्गा म्हणजे माझी आत्या...
       तिचं माहेरचं नांव मथु होतं. माझ्यासाठी ती खूप खास आहे. कारण हल्ली अनेकदा मला मी तिच्या सारखीच वागते असं खूप जाणवतं. तिची तब्येत हे तिचं आवडतं काळजी करायचं काम असायचं आणि मग त्यासाठी आपला आहार तिचा तिच ठरवायची. हल्ली माझं पण असंच होतं असतं. माणसं जमवणं, समारंभ आयोजणं ही तिची खासियत होती. पण खूप गंमतीशीर गोष्ट म्हणजे तिला त्या समारंभात अचानक थकवा जाणवू लागायचा आणि ती चक्क तो सगळा घोळ तसाच मागच्या माणसावर सोपवून पडायला जायची. मलाही तसंच अचानक थकायला होतं आणि तिची आठवण येते.
       ती एकमेव होती जी दादांना तिला जे काही वाटत असेल ते न घाबरता सांगायची. दादा पण तिचं ऐकून घेत. पण अशा वेळा फार कमी आल्यात कारण तिचा आपल्या भावाच्या निर्णयांवर पूर्ण विश्वास होता. माझी आई आणि ती मनानं खूप जवळ होत्या. माझ्यावर तिचं खूप प्रेम होतं. जे अनेक प्रसंगातून मला जाणवलंय. तिचं फलटणंच घर, तिचं डोक्यावर पदर घेऊन तुळशी जवळ दिवा लावणं, 'आरती ज्ञानराजा' ही आरती संध्याकाळी तन्मयतेने म्हणणं! अशी ही माझी आत्या अनेकदा‌ मला माझ्या वागण्यातून डोकावताना दिसते.
                  माझी चौथी दुर्गा माझी मामी...
       त्या‌ पिढीतल्या सोसणाऱ्या, न बोलता सहन करणार्‍या स्रीयांच प्रतिनिधित्व करणारी माझी मामी..सुशीला! अतिशय सुगरण असलेली मामी एक वाटी डाळीत पाच वाट्या पाणी घालून अप्रतिम आमटी करायची. तुटपुंज्या पैशात तिनं नेहमी हसतमुखानं संसार केला. तिच्या लाडक्या लेकीचा मृत्यू तिनं धीरानी सहन केला. नोकरीच्या निमित्तानं ती गिरगावातून परळला यायची. तिचं येणं-जाणं आमच्या दारावरूनच व्हायचं. पण कधी उगीचच येऊन आपलं रडगाणं सांगणं, काही मागणं, कधीच नाही. असं वागायला खूप ताकद लागते. आणि ती तिच्यात नक्कीच होती. माझ्यासाठी ती आदर्श दुर्गा आहे.
               माझी पाचवी दुर्गा आहे माझी नलू आत्या...
         माझ्या वडिलांची मामेबहीण असलेली ही आत्या म्हणजे माझ्या आईची नणंदेपेक्षा जवळची मैत्रीण होती. दोघींच्यात खरंखुरं शेअरिंग-केअरिंग होतं. सुरवातीला आईची लेक म्हणून ती माझे लाड करायची. मी साडी नेसायला लागल्यावर तिनं लगेच दोन सुंदर साड्या मला दिल्या आणि ‌ते साड्या देणं शेवटपर्यंत सुरुच राह्यलं. तिचं माहेरचं नांव नलिनी! ती पण एखाद्या कमळाची कशी प्रत्येक पाकळी स्वतंत्र सुंदर असते तशी आपल्या गाण्यानं, सौंदर्यदृष्टीनं, टापटीपीनं, सर्वांना सुंदर भेटी‌ देऊन ती कमळासारखी नेहमी प्रफुल्लित असायची आणि तिचं सासरच नांव 'प्रतिभा! तेही तिनं आपल्या कलागुणांनी सार्थ ठरवलं होतं. माझ्या लग्नानंतर ती माझी पण लाडकी आत्या होऊ लागली. तिचं पुण्यातलं घर माझं हक्काचं माहेर झालं होतं. तिच्या घरी कधीही गेलं तरी ते स्वच्छ, सजवलेलं, नीटनेटकं असायचं. इतकं प्रसन्न दिसायचं की ‌तिच्या सौंदर्यदृष्टीचं कौतुक वाटायचं. खरं म्हणजे तिचं आयुष्य तरूण मुलाचा‌ मृत्यु, प्रतारणा अशा ‌दु:खाच्या अनेक‌ अनुभवांनी खडतर झालं होतं. पण त्या खडकावर ‌फुलं फुलवायचा तिचा नेहमीच प्रयत्न असायचा. तिच्या घरी राहून सकाळी तिला गाताना ऐकणं ही माझ्या आत्याची आठवणीतली अत्तरकुपी!!
               माझी सहावी दुर्गा म्हणजे माझ्या सासूबाई...
        माझ्या सासूबाईंच नांव'लक्ष्मी' आणि त्या तशाच होत्या. त्यांच्या मनाविरुद्ध मी त्यांच्या घरात आले त्यामुळे ‌पहिले थोडे दिवस त्या थोड्याशा फटकून वागत होत्या. पण एकदा आमचं जमल्यावर मात्र त्यांनी स्वैपाकघरातली स्वच्छता जे त्यांच पॅशन होतं ते माझ्या कडून अक्षरशः गिरवून घेतलं. त्या खूप स्पष्टवक्त्या होत्या. त्यामुळे अनेकदा माणसं त्यांना घाबरून असायची.
              माझी सातवी दूर्गा म्हणजे माझी मोठी नणंद...
‌         ह्या नणंदेमुळे मला ह्या घरानं मनापासून स्वीकारलं. हिचं नाव 'हरकव़ंती'. प्रचंड उत्साह आणि सर्वांच्या मदतीला धावून जायचा त्यांचा स्वभाव ह्यामुळे त्या माझी सासरची छान मैत्रीण झाल्या.
             माझी आठवी दूर्गा म्हणजे माझी दुसरी नणंद...
‌‌        हिचं नाव 'निर्मला' ती मोठ्या नणंदेपेक्षा थोडी‌वेगळी! देवधर्म करणारी, थोडी मागे मागे रहाणारी, सासरच्या मोठ्या कुटुंबात रमणारी अशी आहे. मला जैन धर्म तिच्याकडून शिकायला मिळाला.
              माझी नववी दुर्गा माझी‌ धाकटी जाऊ सविता...
          आम्हा दोघींची लग्न दोन महिन्यांच्या फरकानीच झाल्यामुळे आमचा दोघींचा संसार तसा दोन रूळांसारखा समांतर होत गेला. ती मुंबईत आणि मी डोंबिवलीत पण रोजचे फोन, प्रत्येक गोष्ट        एकेमेकीला विचारून, सांगून करण्याची सवय आम्हा दोघींना कधी लागली कळलंच नाही. आमच्या मुलांना पण नेहमी ‌आईपेक्षा काकी जास्त जवळची वाटते.
        ह्या माझ्या आयुष्यातल्या आदिमाया आदिशक्ती! ज्यांनी मला शिकवलं, घडवलं आणि म्हणूनच ह्या नवरात्रीच्या निमित्ताने ही त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेची ओंजळ देवीला अर्पण केली.
       दहावा दिवस "दसरा" जो माझ्या आते-मामे बहिणी, शाळा-काॅलेजच्या मैत्रीणी आणि गेली पन्नास वर्ष डोंबिवलीत राहिल्यामुळे माझ्या इथल्या सर्व सख्यांना समर्पित! ज्या माझ्या‌ प्रत्येक आनंदात सहभागी झाल्या आणि दु:खात मला धीर द्यायला पाठीशी उभ्या राहिल्या. अशा सगळ्या दुर्गांना मनोमन शतशः प्रणाम...



                           अश्र्विन शुद्ध प्रतिपदा
                              ता. १७.१०.२०२०
                                 ललिता छेडा.