Tuesday, July 21, 2020

श्रावणझुला..

             पंचमीला ग बांधून झुला
श्रावण आला ग सखी श्रावण आला।
प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात उत्सवांचा ऋतू फुलवणारा श्रावण कायम हर्षच आणत असतो...
आषाढाचे २० दिवस नंतर श्रावण, भाद्रपद, अश्र्विन आणि पुन्हा कार्तिकाच्या सुरवातीचे १० दिवस असा एकूण चार महिन्यांचा चातुर्मास! त्या चार महिन्यातला श्रावण म्हणजे सृष्टीच्या चैतन्याचा महिना! ह्या महिन्यात प्रत्येकांसाठी आनंद देणारे सण-सोहळे साजरे केले जातात.
नवविवाहितेसाठी मंगळागौर, जिवतीची पुजा करुन मुलांना ओवाळणार्‍या आईसाठी मायेची ऊब, भावा-बहिणीचं नातं जपणारं रक्षाबंधन, घराघरात होणारी सत्यनारायणाची पूजा, त्याशिवाय गल्लीपासून मोठ्या मोठ्या चौकापर्यंत तरूणांसाठी गोकुळाष्टमीचा सार्वजनिक आनंदोत्सव, नारळी पौर्णिमेला निसर्गाची म्हणजेच समुद्राची पूजा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या महिन्यात आपल्या परंपरेनुसार प्राणीमात्रांसाठी सुध्दा कृतज्ञता व् श्रावणसरी! निसर्ग फक्त हिरव्यागार गालिच्यांनी सजलेला नसतो तर विविध रंगांची उधळणही करत असतो. एखादी सर येऊन गेल्यावर पडणारं पिवळं-केशरी ऊन, संध्याकाळी पाऊस पडून गेल्यावर ढगांची जांभळ्या, तांबड्या रंगांची रंगपंचमी, सुखावून टाकणारी वार्‍याची झुळूक! अशा पावसाळी वातावरणात डोंगरदऱ्यात फिरण्यासारखं सुख नाही पण ह्यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे पावसाळी पर्यटन बंदच आहेत. पण निसर्गानी मात्र त्यामुळे मोकळा श्वास घेतलेला दिसतो.

माझी आई दर चातुर्मासात वेगवेगळे नेम धरत असे.
माझ्या आठवणीतले म्हणजे पांढरी फुलं, बेल, तुळस, दुर्वांच्या जुडी वाहायच्या, वाती लावायच्या असे चार महिने तिचे वेगवेगळे नेम चालायचे. तिच्या मैत्रिणी तिला त्यासाठी खूप मदत करायच्या. दामोदर हॉलच्या मागे छोटीशी बाग होती तिथं तिला खूप फुलं, दुर्वा मिळायच्या.
श्रावणातल्या दर शुक्रवारी जिवतीची पूजा मग मला ओवाळणं! एखाद्या शुक्रवारी सवाष्ण जेवायला असायची त्यादिवशी कधी पुरणपोळी कधी पुरणाच्या दिंडांचा बेत असं सगळं साग्रसंगीत असायचं. श्रावण सोमवारी शाळा लवकर सुटायची आणि त्यादिवशी जेवणं पण लवकर व्हायची. भाजलेल्या धान्याची खिचडी, धिरडी असा मेन्यू असायचा. श्रावणात आई प्रत्त्येक रानभाजी करायची. केन्या, टाकळा आणायला आम्ही दोघी कधी कधी डोंबिवलीला आत्यांकडे एखादी चक्कर सुध्दा मारत असू. मला आवडतात म्हणून ओल्या नारळाच्या करंज्या आणि नारळी भात हमखास ह्या महिन्यात व्हायचाच.
आमच्या परळच्या घरात माझ्या आईनं उषाकाकुची खूप हौसेनं मंगळागौर साजरी केली होती. रात्रभर खेळलेले मंगळागौरीचे खेळ, पहाटेची काॅफी सगळं अगदी लख्ख आठवणींत राहिलं आहे.
लग्नानंतर डोंबिवलीला आल्यावर श्रावणाचे खूप संदर्भ बदलले. गुजराती मंडळींची गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी शिळासप्तमी असते. मी ती आवर्जून करायला लागले. सप्तमीच्या आदल्या दिवशी भेळेची तयारी, वर्‍याचे तांदूळ आदल्या दिवशी शिजवून फ्रीजला ठेवायचे, दहीवडे, घारगे असे बरेच पदार्थ ह्यानिमित्तानं बनवून ठेवायचे आणि त्यामुळे सप्तमीचा दिवस मस्त आरामात जायचा. हा उपास आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी करावा हे कळल्यावर तर त्याला एक भावनिक जोड ही मिळाली.
ज्ञानदीप आणि महिला बॅंकेत काम करायला लागल्यावर हळदीकुंकू, सवाष्णीची ओटी भरणं ह्यासगळ्याला सामाजिक अर्थ असलेला जाणवला आणि विचार बदलले.
जैनांचं पर्युषण पर्व ह्याच महिन्यात सुरू होतं आणि भाद्रपदात संपत. त्यामुळे ती माहिती अर्थात भाद्रपदात येईल.
असा हा आठवणीतला श्रावण झुला......
महानोरांच्या शब्दात म्हणजे

।।रानांत रानांत जांभूळवनात
झडली श्रावणगाणी
गंधल्या मातीत पुनव उजट
अंकुरे लाख वितांनी।।

श्रावण
 शुद्ध प्रतिपदा
ता. २१ जुलै २०२०
ललिता छेडा.




Sunday, July 5, 2020

दादा आणि मी....

         गेल्या काही वर्षांत अनेक प्रकारचे 'डे' दर महिन्याला साजरे होऊ लागलेत. त्याचा एक मोठा फायदा झालाय आणि तो म्हणजे काही व्यक्ति, संबंध ह्यांचा विचार आपण फार कमी करत होतो, त्याविषयी व्यक्त होण्याची संधी मिळू लागली. असंच एक नातं म्हणजे वडील आणि मुलांचे नातेसंबंध!
जुन महिन्याच्या तिसऱ्या रविवारी येणारा 'फादर्स डे' माझ्यासाठी हा लेख लिहायला प्रेरणा देऊन गेलाय.
ह्या लेखाच्या निमित्ताने बापलेकीच्या नात्यातल्या वेगवेगळ्या वळणांचा, विविध टप्प्यांवर बदलेल्या संबंधांचा विचार करायला लावणार्‍या अनेक आठवणी ताज्या झाल्या. संगोपन, समुपदेशन हे शब्द आमच्या पिढीतल्या अनेकांना अजिबात माहीत नव्हते. कारण आई वाढेल ते निमुटपणे खायचं आणि वडील म्हणतील ते काहीही न बोलता ऐकायचं! अशी साधारणपणे त्याकाळाची लाईफस्टाईल होती.
दादांच्या स्वभावातला रागीटपणा, शिस्त ह्याचं दडपण नक्कीच होतं. त्यांच्या रागीटपणाचा अनुभव त्यांच्या जवळच्या बहुतेकांनी कमी-जास्त प्रमाणात घेतलेलाच आहे. पण मी मात्र त्यांच्या स्वभावातली खास वैशिष्ट्यं, आम्हां बापलेकीच्या नात्यातल्या गमतीजमती इथं शेअर करणार आहे.
दादांच वाचन खूप होतं. त्यातसुद्धा वाचलेल्या गोष्टींची टिपणं काढण्याची त्यांची वेगळी पध्दत होती. ती टिपणं म्हणजे वाचलेल्या लेखांवर, गोष्टींवर त्यांचं भाष्य असायचं. मला आवर्जून ते वाचायला सांगत असत. पण मी मात्र तेव्हा वाचायला अळंमटळंम करत असे. आज त्याचा नक्कीच पश्र्चाताप होतोय. सकाळी रोज सगळे मराठी पेपर आॅफीसमुळे आमच्या घरी यायचे. जवळजवळ तासभर त्यांचं पेपर वाचन चालायचं. आमच्या घरी नवशक्ती यायचा बाकीचे पेपर ते खाली आॅफिसमध्ये घेऊन जायचे. साधारण सहावी इयत्तेनंतर मी रोज शाळा सुटल्यावर इंग्रजी पेपर वाचायला आॅफिसमध्ये जात असे, तेव्हा इतर पेपरातल्या महत्त्वाच्या बातम्या, अग्रलेख मी वाचावेत यासाठी खूणा करून ठेवलेले असायचे. त्यांच्यामुळेच मला वाचायची आणि टिपणे काढायची सवय लागली आहे. ह्या लेखाच्या निमित्ताने हे सांगायला मिळतंय हेही नसे थोडके!! त्यांच्या आईचे काका म्हणजे नाटककार आदरणीय कृ. प. खाडिलकर! त्यांची सर्व नाटकं त्यांच्या जवळ होती. तुकाराम गाथा, गीतारहस्य, सार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध अशी अनेक पुस्तकं त्यांच्या संग्रहात होती आणि त्या पुस्तकांची त्यांनी अक्षरशः पारायण केली होती. परेलहून डोंबिवलीला शिफ्ट होताना त्यांनी ती पुस्तकं त्यांच्या जवळच्या मंडळींना गिफ्ट म्हणून दिली. तेव्हा मी मुलं खूपच लहान असल्यामुळे माझ्या व्यापात इतकी व्यस्त होते की ती पुस्तकं आपल्या जवळ ठेवावीत हे खरंच सुचलं नाही आणि एक मौल्यवान ठेवा मी गमावला. दादांच्या वाचनात इतकीच रोजची पूजा खूप आठवणीत रहाणारी होती आणि आई त्या पुजेची तयारी छान करून द्यायची. पण त्यांना देवळात आवर्जून गेलेलं मात्र आठवत नाही.
दादाना सगळ्या खेळांची आवड होती. ते स्वत: फुटबॉल खेळत होतेच. ते स्टेट लेव्हलवर देखील खेळले आहेत. त्यांनी कॅरम बोर्ड एका स्ट्रोक मध्ये सर्व काळ्या किंवा सर्व पांढऱ्या सोंगट्या घेतलेल्या मी बघितल्या आहेत. आई आणि माझ्या बरोबर कॅरम खेळताना आमच्या दोघींचे शाॅट बघून ते दोन बोटं कपाळाला ज्यापध्दतीने लावायचे जाम हसू यायचं अर्थात त्यांना ते हसणं आवडतं नसे पण आमचा खेळ काही सुधारला नाही. पत्ते खेळताना पण ते खूप मनापासून आणि आवडीने खेळत. ब्रिज त्यांचा आवडता खेळ! आम्ही तिघं कत्थ्रोट खेळायचो. खेळ ब्रिजसारखाच पण चौथी गेम जास्त बोललेल्यासाठी ओपन होत असे. बाकीचे दोघे भिडू! आम्ही भिडू झालो की आईला हरवायला आम्ही दोघे जाम चिटींग करत असू, तिला ते कधीच कळलं नाही. मला बुद्धीबळ त्यांनीच शिकवलं. ते उत्तम खेळायचे. पण माझी त्या खेळातली गती बघून त्यांनी तो नाद सोडून दिला. ते म्हणायचे" लल्या, तुला खेळ समजलाना बास झालं! अरे हो, माझं माहेरचं लाडाचं नांव 'लल्या' आहे. पुढे नातवंडांशी पण तितक्याच उत्साहानं ते कॅरम, पत्ते, बुद्धीबळ खेळत असत.
त्यांना आॅफिसला सोमवारी सुट्टी असल्यामुळे रविवारी दुपारी जेवणं झाल्यावर अनेकदा ते म्हणायचे" चला, लल्या, 'तिर्र गो' करायला जाऊया. 'तिर्र गो' हा त्यांचा खास शब्द त्याचा अर्थ 'उगीचच फिरायला जायचं' आणि मग ते मला इराॅस, रिगल, मेट्रो थिएटरमध्ये इंग्रजी सिनेमा बघायला न्यायचे. सिनेमा अर्थात चार्ली चॅप्लीन, लाॅरेल- हार्डी ह्यासारखे पिक्चर तसेच काही क्लासिकल इंग्रजी चित्रपट पण आम्ही बघितले आहेत. गणेशोत्सवात गिरगाव, दादर, परळ, लालबागचे गणपती बघायला जायचा आम्हां दोघांचा कार्यक्रम रविवार/सोमवारच्या दुपारचा ठरलेला असायचा. त्यांचा त्या दर्शनाचा रूट निश्चित होता आणि तो त्यांनी कधीच बदलला नाही. महत्त्वाचं म्हणजे शक्यतो चालत जायचं. गोकुळाष्टमीला गिरगांवातले चित्ररथ मला खांद्यावर घेऊन मी ६/७ वर्षांची होईपर्यंत दाखवले आहेत. त्यानंतर ते त्यादिवशी वर्षातून एकदा आजीकडे जेवायला जायचे. आई-आजीला तोच आनंद असायचा. त्याशिवाय ते सभासद असलेल्या एशियाटिक लायब्ररी, गिरगांव चौपाटीला मधून मधून जायचंच! आमच्या कडे आलेल्या नातेवाईकांना मुंबई दर्शन करावावं तर त्यांनीच! अनेकांना त्यांनी दाखवलेली राणीची बाग अजुनही आठवत असेल. तिथे पण रूट ठरलेला. आईसफ्रुट खायची जागा नक्की! प्रत्त्येक गोष्ट एका शिस्तीतच व्हायला हवी हा त्यांचा अट्टाहास असायचा. तत्व आणि शिस्त त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता.
त्यांना अभ्यास घ्यायला आवडायचं पण शिकताना विद्यार्थ्याची फटका खायची तयारी हवीच.
दादांचं गोष्ट सांगणं म्हणजे खूप आनंददायी अनुभव असायचा. त्यांची 'तीच ग मी' ही गोष्ट ज्यांनी ज्यांनी ऐकलेय ते कोणीच गोष्ट ऐकतानाच घाबरणं विसरणारच नाही.
दादा पट्टीचे पोहणारे होते. सांगलीला असताना कृष्णेच्या पुरात पोहल्याच्या अनेक आठवणी ते सांगत असत. मला पोहायला शिकवावे असं त्यांच्या मनात आलं आणि एका मे महिन्याच्या सुट्टीत मला भोपळा बांधुन विहीरीत ढकललं आणि ते पण विहीरीत उतरले थोड्याच वेळात त्यांना कळलं की मला पायाला आणि हाताच्या कोपराना लागलंय! रक्त येत होतं. त्यांनी पटकन मला बाहेर काढलं आणि म्हणाले" काही गरज नाही पोहायला शिकायची! खूप अपसेट झाले होते ते मला लागलेलं बघून!
त्यांच्या आयुष्यातलं अतिशय महत्त्वाचं वळण म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध मी केलेलं लग्न! मी घरातून गेल्यावर त्यांना झालेला मनस्ताप नंतर सर्वांनी सांगितलाच पण मी घरी येऊ का? असं विचारल्यावर' लग्नाचं सर्टिफिकेट घेऊन ये! आणि एकटीच ये. येवढंच बोलले. मी घरी गेले तेव्हा शांतपणे दोन शब्द बोलून बाहेरच्या खोलीत जाऊन बसले. त्यानंतर जावई म्हणून डॉ.चा स्वीकार करायला त्यांनी सहा महिने घेतले. आमचं स्वत:च डोंबिवलीत घर झाल्यावर घरी येऊन डॉ.शी बोलायला सुरुवात केली.
लग्नानंतर मला खूप कांजण्या झालेल्या. त्यावेळी त्यांनी माझी केलेली सेवा, घेतलेली काळजी मी कधीच विसरणार नाही.
डोंबिवलीत रहायला आल्यावर नातवंडांना गोष्टी सांगायला, अभ्यास घ्यायला ते रोज माझ्या घरी येत असत. नंतर ते आजारी झाल्यावर माझ्याच बिल्डींगमध्ये देवाच्या कृपेने त्यांना तळमजल्यावर जागा मिळाली. ह्या सगळ्या वर्षात त्यांनी कधीच माझ्या लग्नाबद्दल काही विषय कधीच काढला नाही.
अनेकदा काही प्रसंगात त्यांच्या कठोरपणामुळे आईला जे सोसावं लागलं ते मनातून जात नाही. पण त्याकाळी सर्वसाधारणपणे स्त्रीयांनी निमुटपणे सहन करायचं अशी परिस्थितीच होती. आजच्या लेखात आईबद्दल लिहायचं शक्यतो टाळलंय!
माझं लिखाण, पुस्तक प्रकाशित झालं हे सर्व बघायला ते दोघंही नाहीत ही खंत वाटते. पण त्यांच्यामुळेच मी लिहीती झालेय. हे पण तितकंच खरं आहे.
आम्हा बाप-लेकीची नातं उलगडताना माझी एक स्मरणयात्रा घडली. आज गुरु पौर्णिमा, त्यामुळे माझ्या पहिल्या गुरुं बद्दल लिहायला मिळालं हे माझं नशीब! ह्यानिमित्ताने माझ्या आई- वडिलांच्या स्मृतीला वंदन करते आणि इथंच थांबते.


                       आषाढ शुद्ध
 पौर्णिमा
                          ता. ५-७-२०२०

                           ललिता छेडा