खरं म्हणजे अमलताश म्हणजे 'बहावा'.चैत्री पौर्णिमेपासून बहरायला लागणारा हा वृक्ष वैशाखात पिवळ्याजर्द रसरशीत घोसांंनी बहरून जातो. आम्ही बंगल्यात रहायला आल्यावर सर्वात प्रथम दाराशी बहावा लावला.दुसर्या बाजूला पिवळा गुलमोहर होताच. पिवळ्या फुलांचा पसरट घेराचा तो गुलमोहर वैशाखात अपार फुलतो.त्यामुळे उन्हाळ्यातल्या सकाळी त्या दोन्ही झाडांच्या पिवळ्या रंगांवर पडणार्या कोवळ्या सोनेरी किरणांमुळे वैशाखवैभवाची चाहूल लागते.
'अमलताश' हा शब्द मला कळला तो डाॅ. सुप्रिया दीक्षित-संत ह्यांच्या ह्याच नावाचं पुस्तक वाचनात आलं तेव्हा! सुप्रियाताई ह्या प्रकाश संतांच्या सुविद्य पत्नी आणि इंदिरा संतांच्या सुनबाई आहेत.संतांच्या कुटुंबीयांचे अनुभव, प्रकाश संताबरोबरच्या सहजीवनाचं उत्कट वर्णन म्हणजे हे पुस्तक आहे. पुस्तक वाचल्यावर बहाव्यापेक्षा मला 'अमलताश' जवळचा वाटू लागलाय.
दुर्गाबाई भागवतांनी खूप छान म्हणून ठेवलंय"जे जे म्हणून वसंताच आहे त्याला पूर्णत्व व अखेरीस विराम देण्याचं काम वैशाखाचेच असते. म्हणूनच वैशाखाला त्यांनी 'चैत्रसखा' म्हटले आहे.
वैशाखी पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा! गौतम बुद्धांचा जन्म,ज्ञान साक्षात्कार आणि मृत्यू ह्याच पौर्णिमेला झालं असल्यामुळे ही पौर्णिमा त्रिगुणीत महत्त्वाची मानली जाते.
ह्या पौर्णिमेच्या शीतलतेला सुगंधाचीही साथ असतेच. कारण ह्याच काळात कुठेतरी रातराणीचा सुगंध,मोगरा, सायली,देखणी गुलबक्षी आणि वैशाखवैभव मदनबाण फुलून सृष्टीला सुगंधित करत असतात.
मदनबाणाची एक छान आठवण म्हणजे लग्नानंतर डोंबिवलीत आल्यावर उन्हाळ्यात फडके रोडवर एक गजरेवाला रोज मदनबाणाचे गजरे घेऊन यायचा. मी आणि माझी मैत्रीण जयश्री रोज त्याच्याकडे गजरा घ्यायला जात असू.मुख्य म्हणजे तोदेखील आमची वाट बघायचा.उन्हाळ्यात मदनबाण आणि श्रावणात हिरव्या बांगड्या भरणं आम्हा दोघींचा आवडता कार्यक्रम होता.
वैशाखातल्या माझ्या लहानपणीच्या आठवणीत आईची वाळवणांची सुरू होणारी गडबड आहे. परळला असताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात माझी परीक्षा झाली की आई तिच्या भगिनी मंडळातर्फे मंडळाच्या जागेत पापड,लोणच्याचा स्टाॅल लावत असे. त्यामुळे तिची घरासाठी आणि मंडळासाठी चिकवड्या, कुरडया, बटाटा कीस, सांडगी मिरच्या असं बरंच काही बनवण्याची लगबग सुरू होई. तिचा साबुदाणा, गहू विकत घेण्याचा दुकानदार ठराविक....साबुदाणा शिजवायचं पातेलं ठराविक...वर्षभर जपून ठेवलेले प्लास्टिकचे दोन कागद ठराविक... वाळवणं भरुन ठेवायचे पत्र्याचे डबे ठराविक... सगळं कसं नीटनेटकं आणि शिस्तीत असायचं. अनेकदा गिरगावातून आजी तिला मदत करायला यायची.
सकाळी खूप लवकर उठून आम्ही दोघी गच्चीवर चिकवड्या घालायला जायचो. आईच्या सुचना सुरू असायच्या ' एकसारखी घाल, एका ओळीत घाल.ती म्हणायची " कोणी बघितलं तर एखाद्या रांगोळी सारखं दिसलं पाहिजे.माझं लक्ष मात्र शेवटी उरलेला चीक खाण्याकडे असायचं. मला त्याच्यात साईचं दही घालून खायला आवडायचं.आई रात्री छोट्याशा वाटीत माझ्यासाठी दही विरजून ठेवायची.जवळजवळ उन्हाळाभर तिची कामं सुरूच असायची.चिकवड्या तर किती रंगांच्या बनवायची.
सतत कामात राहायला आईला फार आवडायचं त्यामुळे डोंबिवलीला रहायला आल्यावर ती उन्हाळ्यात गव्हाच्या कुरडया आणि सांडगी मिरच्या करून विकत होती.त्यात पैसे मिळवण्यापेक्षा नात्यातल्या, ओळखीच्या मंडळींना काही बनवून देण्याचा आनंद जास्त असायचा. आणि महत्वाचं म्हणजे दादा( माझे वडील) तिला ह्या सगळ्यात खूप मदत करायचे. आईला ऑर्डर देणारी मंडळी वाळवणं न्यायला यायची आणि बहूतेक आईकडे, गप्पा मारून जेवूनच जायची.हे सगळं व्यवहाराच्या पलिकडचं असायचं.
माझं लग्न झाल्यावर माझ्या नणंदेचा, हरकवंतींचा उत्साह देखील आईसारखाच होता. ती दरवर्षी चुंदा करायला उन्हाळ्यात आमच्या घरी यायची आणि आईकडून महाराष्ट्रीयन पदार्थ शिकून जायची.दोघींच गुजराती लोणची, मराठी पन्हं अशी शिकवणी चालायची.आईची त्याकाळातली खास विद्यार्थी आणि मदतनीस म्हणजे रजनी उर्फ रजी सरदेसाई. आता मागे वळून बघताना एक गोष्ट जाणवतं की ' ही मंडळी कोणतंही काम टेन्शन न घेता आनंदाने, आवडीने करत असत.त्यामुळे त्यांना थकवाही जाणवत नसे.
असा हा आठवणीतला वैशाख! माझ्या जिभेवर गव्हाचा चीक, सायीच्या दह्यातल्या चिकवड्या,ताज्या तांदळाच्या फेण्या ह्यांची चव रेंगाळवणारा उन्हाळा!
सध्या मात्र अनोळखी व्हायरसवर ए.सी.मध्ये बसून टी.व्ही वरची चर्चा, बातम्या ऐकताना,ह्या लेखाच्या निमित्ताने जुन्या साध्या जगण्यातल्या आठवणींची ही हलकीशी झुळूक सध्याच्या लाॅकडाऊनच्या परिस्थितीत नक्कीच सुखावणारी ठरतेय.
वैशाख शुद्ध प्रतिपदा
२४ एप्रिल २०२०
ललिता छेडा.
Friday, April 24, 2020
वैशाखवैभव अमलताश
Wednesday, April 8, 2020
स्वत:ला शोधताना..
मराठी महिन्यांवर ब्लाॅग लिहील्यावर तो महिना साधारणपणे ज्या इंग्रजी महिन्यात येतो त्या महिन्यातल्या खास दिवसावर लिहायचं ठरवतेय. चैत्र साधारणपणे 'मार्च' महिन्यात येतो. आणि मार्च म्हणजे महिला दिन! म्हणूनच स्री म्हणून आपल्याला मिळालेल्या संधींचा आपण कितपत स्वत:साठी उपयोग करून घेतला ह्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करायचं ठरवलं.
माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे ८ मार्च,कारण लग्नानंतर वर्षभरानी ह्याच तारखेला माझ्या लेकीचा 'निलमचा' जन्म झाला.त्यानंतर तीन वर्षांनी मुलाचा ' किरणचा' जन्म झाला.मुलांच्या जन्मानंतर खर्याखुर्या अर्थाने संसाराची सुरुवात होते. मग तो प्रेमविवाह असो की ठरवून केलेला विवाह असो, संसारातील तडजोडींना सामोरं जावंच लागतं. मला नेहमीच मुलं, घर सांभाळून काही तरी करावं असं सतत वाटत असल्यामुळे बाटिक प्रिंटींग,योगशिक्षक, ब्युटीपार्लर असे वेगवेगळे डिप्लोमा केले.गंमत म्हणजे पदवीची शेवटची परीक्षा मात्र आजतागायत देता आली नाही.
घरातल्या घरात पार्लर चालवायला सुरुवात केली.पण स्वत:च्या बिल्डींगमध्ये स्वत:च्या घरात रहायला गेल्यावर पार्लर बंद करावं लागलं.खरं म्हणजे पार्लर सुरू करून दोन वर्षे झाली होती आणि चांगलं चालतही होतं. छोट्या मोठ्या आॅर्डर येत होत्या पण कधी कधी आपण स्रिया भावनिक होऊन घरासाठी, मुलांसाठी निर्णय घेतो, तसं काहीसं माझं झालं होतं.आता मागे वळून बघताना वाटत तेव्हा जिद्दीनं पार्लर सुरू ठेवलं असतं तर कदाचित आयुष्य काही वेगळ्या वाटेनं गेलं असतं.
व्यवसाय सुरू झाला नाही पण एक वेगळीच संधी मिळाली.
रामनगरमध्येच रहाणाऱ्या भारती मोरे आणि वैशाली ओक एक दिवस अचानक माझ्या घरी आल्या. वैशालीच्या चैतन्य ज्ञानदीप मंडळातर्फे पत्रकारिता वर्ग घेण्यात येणार होते आणि त्या वर्गाला मी यावं असा आग्रह त्या दोघीही करत होत्या. वर्गाच्या शेवटी लेखी परीक्षा घेतली जाणार होती आणि मला तेच नकोसं वाटत होतं. मग वैशालीनी " तू परीक्षेला बसू नकोस" असा पर्याय दिला. त्या अटीवर मी वर्गाला यायला तयार झाले.पण त्या वर्गाचे प्रमुख असलेल्या मा.बेटावदकर सरांनी इतकं छान शिकवलं की मी सहज परीक्षा दिली आणि पहिला वर्ग पण मिळवला.
त्याच वर्गात रोज डोंबिवली पूर्वेला ज्ञानदीप मंडळं सुरू करायच्या चर्चा व्हायच्या! कारण पश्र्चिमेला ज्ञानदीपचं कार्य जोरात सुरू झालं होतं. भारती मोरे पुर्वेला ज्ञानदीपचं कार्य सुरू व्हावं ह्यासाठी मनापासून खूप प्रयत्न करत होती.अशाच एका मंडळाच्या स्थापनेसाठी स्मिता तळेकरकडे मिटींग ठरत होती. २७ सप्टेंबर १९८५ 'अनंत चतुर्दशीच्या' दिवशी ही मिटींग ठरली होती. स्मिता आणि भारतीनी मला आवर्जून आमंत्रण दिलं होतं. मीपण अगदी सहज उत्सुकतेपोटी तिथं जायचं ठरवलं.मिटींगमध्ये मंडळाचं नांव"उन्मेष" ठरलं! स्मिता मंडळाची अध्यक्ष असणार हे नक्कीच होतं. पण ऐनवेळी तिनं अध्यक्ष नाही होणार पण मंडळाची सक्रीय सभासद होऊन सगळ्याप्रकारची मदत करेन असं ठामपणे सांगितलं.त्यामुळे हजर असलेल्यांमध्ये 'तू हो अध्यक्ष' असं ऐकमेकांमध्ये अडम-तडम सुरू झालं. आणि अगदी अनपेक्षितपणे अध्यक्षपदाची माळ माझ्या गळ्यात पडली. ह्यामध्ये भारतीने मी अध्यक्ष व्हावे अशी आग्रही भूमिका घेतली होती.
मी तिचे ह्या निमित्ताने नक्कीच आभार मानेन.कारण जो काही संस्थेत काम करण्याचा अनुभव, सामाजिक भान मला आलं आहे त्याच श्रेय नक्कीच ज्ञानदीपला जातं. भारतीनेही काम करतानाची शिस्त, कार्यक्रमाचं आयोजन हे सर्व वेळोवेळी शिकवलं. त्याशिवाय उमा आवटेपुजारी, विद्या राळे, मंदा खापरेंसारख्या असंख्य मैत्रिणी, आबासाहेब पटवारींसारखे अनेक मार्गदर्शक ' उन्मेष' च काम करताना मला लाभले.आणि माझ्या मनातली पार्लर न काढल्याची खंत हे काम सुरू झाल्यावर निवळून गेली.अत्यंत महत्त्वाचा उल्लेख केलाच पाहिजे तो म्हणजे आकाशानंद! ज्ञानदीपच्या कार्यकर्त्यांच प्रेरणास्थान! मला देखील त्यांचे आशीर्वाद कायमच मिळाले. जे मला नेहमीच प्रेरणादायी ठरले. आणि माझं उन्मेष ज्ञानदीप मंडळ! ज्याच्या पहिल्या वर्षापासून आज ३५ वर्ष माझ्या सोबत असणार्या सर्वजणी सभासद न रहाता आमचं एक कुटुंब झालं आहे.
ज्योतीनं ज्योत प्रगटवावी तशी डोंबिवली पूर्वेला एकंदर १८ ज्ञानदीप मंडळं स्थापली गेली. भारतीच्या अथक प्रयत्नानं ती सर्व मंडळं एकत्र येऊन अश्र्विनी ज्ञानदीप संघ स्थापला गेला. आम्ही सर्वजण भारावल्यासारखे संघटितपणे काम करत होतो. स्वतंत्र आपआपल्या मंडळांच आणि अश्र्विनी संघाचं असं काम सुरू होतं.
ज्ञानदीपमुळे मला अगदी जवळच्या दोन मैत्रिणी मिळाल्या.. वैशाली ओक आणि मीना गोडखिंडी! मी थोडी उंच आणि त्या दोघी बुटक्या त्यामुळे आम्हा तिघींना 'एक शुन्य शुन्य' असं गंमतशीर नांव पडलं होतं. मी १९९० ते१९९५ अशी पाच वर्षे अश्र्विनीची अध्यक्ष होते. ह्या काळात आम्ही तिघी सतत बरोबर असायचो. वैशाली आणि मीना तशा वेगवेगळ्या स्वभावाच्या त्यामुळे माझ्या कामाचा खूप छान बॅलन्स व्हायचा.मीनाचं प्रत्येक काम वेळेत,शिस्तीत व्हावं ह्यासाठी आग्रही असणं आणि वैशालीचं काम हातात घेतलयं ना मग ते होईल ती वेळ आपली अशी वृत्ती! आम्हा तिघींना एकत्रित काम करायला मजा यायची. त्यामुळेच आम्ही ज्योती पाटकर,इंदू देढिया आणि जयश्री करमरकर ह्या तिघींना आमच्या बरोबर घेऊन 'माध्यम' ही संस्था स्थापन केली.संस्थेच्या माध्यमातून घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रदर्शनं भरवण्याचं ठरलं.जवळजवळ तीन वर्ष आम्ही प्रदर्शनांच्या आयोजनाच्या निमित्ताने खूप मजा केली.आम्हा तिघींमध्ये अनेकदा रागवारागवी व्हायची,इतर मैत्रीणींशी मतभेद व्हायचे पण ते सगळं तेवढ्यापुरतं असायचं.पण अचानक दृष्ट लागल्यासारखी वैशाली आम्हाला सोडून गेली.तिच्यानंतर गेल्या वर्षी ज्योतिचं पण दु:खद निधन झालं. ह्या दोघीही आठवणीतून मनात सतत आहेत.
ज्ञानदीप,माध्यम ह्या सर्व कामातून डोंबिवलीत खूप ओळखी झाल्या होत्या.त्यामुळेच डोंबिवलीत महिला बॅंक सुरू व्हावी ह्या परवानगीसाठी धडपडणाऱ्या मंगलाताई कुलकर्णीशी भेट झाली आणि त्याशिवाय आबासाहेबांनी महिला बॅंकेच्या परवानगीच्या प्रपोजलवर सह्या करणार्या दहाजणींमध्ये माझी सही घेतली होतीच. बारा वर्षांच्या परिश्रमातून १९९२मध्ये डोंबिवलीत महिला बॅंकेला परवानगी मिळाली.आणि मी ह्या बॅंकेची संचालक व्हावं असं मला सुचवलं गेलं. मी अर्थात नाही म्हटलं होतं पण खूप आग्रह झाला आणि २९मे १९९२ रोजी सुवर्ण मंगल महिला सहकारी बँकेच्या पहिल्या संचालक मंडळात माझं नाव लिहीलं गेलं. त्यावेळी नेहमी मनात यायचं ज्ञानदीपसारख्या दूरदर्शनशी संलग्न असलेल्या कामातून मला आवडणार्या अभिनय, लेखन ह्याची कधीच संधी मिळाली नाही आणि गणितासारख्या माझ्या नावडत्या विषयाशी संबंधित असलेल्या बॅंकेच्या संचालकपदावर काम करावं म्हणून आग्रह होत होता.
बॅंकेत अठरा वर्षे संचालक,अध्यक्ष,उपाध्यक्ष अशा वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना चांगले-वाईट खूप अनुभव आले. ज्ञानदीपचं काम करताना समाजासाठी काहीतरी करण्याचा आनंद मिळत होता.
बॅंक मात्र एका राजकीय पक्षाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे समाजकारणा इतकंच राजकारणपण बर्यापैकी अनुभवायला मिळालं. बॅंकेत काम करताना जयश्री कर्वे आणि सुनिती रायकर अशा दोन मैत्रिणी मिळाल्या. आर्थिक काम असुनही सगळ्या सहकारी संचालिका अतिशय प्रामाणिकपणे काम करणाऱ्या होत्या ही खूप महत्त्वाची आणि आनंददायी गोष्ट होती. त्याकाळात जवळच्या मैत्रिणी म्हणून सुनिती आणि जयश्रीशी प्रत्येक गोष्ट शेअर करायची सवय लागली. जी अजूनही तशीच आहे.
बॅंकेच्या कामामुळे ग्लॅमर मिळालं, मोठ्या मोठ्या व्यक्तिचं कार्य जवळून बघायला मिळालं. त्याचबरोबर माणसातल्या वागण्यातला स्वार्थ,इर्षा जवळून अनुभवता आली. असे अनुभव आपल्याला नक्कीच प्रगल्भ करतात. बॅंकेत केलेल्या कामामुळे माझ्या स्वभावात कमालीचा पेशन्स आला. निर्णय घेताना, बोलताना विचार करून बोलायची सवय लागली.
२०१० मध्ये परिस्थितीला शरण जाऊन बॅंक दुसऱ्या बॅंकेत विलीन करावी लागली. मला स्वत:ला हा माझा वैयक्तिक पराभव व्हावा इतकं दु:ख झालं.
त्यानंतर मात्र कोणत्याही संस्थेत, पदांवर अजिबात काम करणार नाही असा स्वत:शीच निर्णय घेतला. पण देवाच्या मनात काही तरी वेगळंच होतं. संस्था,पद काहीही नसलेल्या पै सरांच्या कट्ट्यावर मी काम करावं अशी पै सरांनी इच्छा व्यक्त केली. आणि काम आवडतं असल्यानं आणि माझ्या मनातल्या अटींमध्ये बसणारं असल्यानं मी ती जबाबदारी घेतलीय. पुन्हा एकदा वेगळ्या संधींचा आनंद मिळतोय.
बॅंक विलीन झाल्यावर अगदी सहज कथा लेखनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि पहिलं बक्षीस मिळालं. त्यानंतर वर्षभर आठवड्याला एक अशा ५२ कथा ब्लाॅगच्या माध्यमातून लिहील्या. ज्याचं ग्रंथालीनं पुस्तक प्रकाशित केलं. ह्या पुस्तकानी मात्र अनेकांनी मिळवून दिला असला तरी जो आनंद मिळाला तो माझ्या एकटीचा होता. आणि आयुष्याच्या संध्याकाळी तो मिळाला म्हणून कृतकृत्य ही वाटतंय!
महिला दिनानिमित्ताने स्वत:ला शोधताना स्वत:मधले सकारात्मक बदल नक्कीच जाणवले. श्रेयासाठी धडपड करण्यापेक्षा 'स्वान्त सुखाय' काम करत रहावे.मिळालेल्या संधींचा मनापासून काम करून आनंद मिळवावा.कारण काय,किती आणि केव्हा मिळणार हे आपल्यासाठी कोणीतरी ठरवून ठेवलंय.जे आपल्याला फक्त आनंदाने स्वीकारायचं आहे हे आता कळलंय!
आयुष्याला जर संगीताची उपमा दिली तर संगीतातल्या सात सुरांसारखं सुंदर,मधुर मनात साठवून ठेवावं असं वाटतंय. कारण रागांमध्ये जसे काही सुर वर्ज्य असतात.तशीच आता आयुष्याची भैरवी वर्ज्य सुर विसरून मधुर आठवणींच्या सुरात गाता यावी हीच परमेश्वराजवळ प्रार्थना!
चैत्र पौर्णिमा
८ एप्रिल २०२०
ललिता छेडा

Subscribe to:
Comments (Atom)