। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी।
श्रावणसरीत न्हातच भाद्रपद येतो आणि गणरायाच्या आगमनाची चाहूल लागते.सत्-चित्-आनंदरुपी अशा गणेशाची मूर्ती आणताना सर्वांनाच जाणवत असतं की हिची ज्ञान आणि विज्ञान अशी दोन रूपे आहेत.उत्सवाच्या निमित्तानं अथर्वशीर्ष कानावर पडत आणि हे वाक्य सतत मनात रूंजी घालत रहातं.त्यामुळेच विज्ञानाच्या जोडीनं येणारं ज्ञानच खरं आहे हे मनातल्या मनात नक्की होत जात...
माझ्या माहेरी गणपती येत नसल्याने माझ्यासाठी लहानपणी गणेश उत्सव म्हणजे गणेश दर्शनासाठी आईसोबत तिच्या मैत्रीणींच्या घरी जायचं आणि दादांबरोबर (वडिलांना मी दादा म्हणायचे) गिरगाव,परेल मधले मोठे मोठे गणपती बघायला जायचं येवढाच होता. तेव्हा हल्ली सारखी नवसाची वेगळी, व्ही.आय.पी.वेगळी, फक्त मुखदर्शन अशा रांगांची व्हरायटी नसायची. दुपारच्या वेळी मंडपात दहा बारा पोरं खेळत असायची. त्यातलाच एक धावत येऊन प्रसाद द्यायचा.आजुबाजुचे दुकानदार सुखेनैव व्यापार करायचे.हल्ली मात्र अफाट गर्दीमुळे म्हणे त्या दुकानदारांना दहा दिवस दुकानं बंद ठेवावी लागतात. त्यावेळी शांतपणे दर्शन घेतलं की मुर्ती भोवतालच्या देखाव्यांविषयी चर्चा, आणि ऐतिहासिक गोष्टींवर आधारित तो देखावा असेल ती गोष्ट ऐकत पुढच्या गणपतीला जायचं असं सगळं साग्रसंगीत दर्शन व्हायचं. दादांना गोष्टी सांगायला खूप आवडायचं.आणि ते त्या सांगायच्याही रंगवून.
माझा मात्र आवडीचा दिवस म्हणजे 'अनंत चतुर्दशी' कारण त्यादिवशी आम्हाला खारला रहाणार्या माझ्या आतेभावाकडे दरवर्षी अनंताची पूजा असायची.पूजेच्या तयारीपासून गुरूजींच जेवणं आटपेपर्यंत सर्व जबाबदारी आत्यांनी माझ्या आईला दिलेली होती.आणि आई ती अगदी मनापासून आणि आनंदाने निभवायची.
त्या आतेभावाचं घर खारला एका मोठ्या, देखण्या बंगल्याच्या आऊट हाउस मध्ये होत. बंगल्या भोवतालची बाग, एक मोठा हौद, बागेत बसायला संगमरवरी बाकं, सुंदर झोपाळा त्यामुळेच माझं आकर्षण म्हणजे पूजा होईपर्यंत त्या बागेत मनसोक्त हूंदडायचं.त्याशिवाय गेटजवळ एक चौथरा होता त्यावर बसलं की पूर्ण रस्ता दिसायचा.त्या गल्लीत अनेक सिनेसृष्टीतील कलाकारांचे बंगले होते.आणि तो दिवस सुट्टीचा असल्यानं अनेकदा पुढच्या गल्लीतल्या खार जिमखान्यात जाणार्या अनेक सुप्रसिद्ध नटनट्यांच दर्शन होत असे. त्यांना तसं बघताना मजा वाटायची. ह्या सगळ्या आठवणी पन्नास वर्षांपूर्वीच्या आहेत त्यामुळे आत्तासारखी सिक्युरिटी, महागड्या गाड्या असं काहीच नव्हतं.
जेवणं झाली की आम्ही लगेच परळला घरी परतायचो.कारण आमच्या दारावरुन विसर्जनाच्या मिरवणुकी सुरू व्हायच्या! आठवणीतली मिरवणूक म्हणजे राजकमलच्या गणपतीची! आणि त्या मिरवणूका बघायला पाहुणे यायचेच.आई पुन्हा संध्याकाळच्या तयारीला लागायची.आता विचार केला तर वाटतं इतकी ऊर्जा हिच्याकडे कुठुन यायची.पुन्हा थकवा नाही,स्वैपाकाचं टेन्शन नाही. मला वाटतं कारण एकच तिला सर्वांना जेवू घालायला आवडायचं.
लग्नानंतर श्रावण-भाद्रपदातला 'पर्युषण' हा सण मी कच्छी जैनांची सुन झाल्यामुळे कळला.आणि स्वभावाप्रमाणे एकंदरच जैन धर्म आणि पर्युषण पर्व ह्याबद्दल खूप वाचन केलं. त्यामुळे मला कळलेला पर्युषण म्हणजे ज्ञान, दर्शन आणि संयमसाधना ह्याचं महत्त्व जाणवून देणारा जैन धर्मातील खास सण हे कळलं.हे पर्व आठ दिवस असल्याने पर्युषणाला 'अठ्ठाई' असे सुध्दा म्हटलं जातं.यापर्वात पाच महत्त्वाची कर्तव्य मानली जातात.
१) अहिंसा- ज्यात निष्क्रिय 'अहिंसा' म्हणजे कोणत्याही जिवाला न मारणे आणि सक्रिय'अहिंसा' म्हणजे एखाद्या जिवाला वाचवणे.
२) साधर्मिक भक्ती- प्रत्येकानं आपल्या आजूबाजूला रहाणाऱ्या सहधर्मिकाविषयी काळजी घेणे,आदर ठेवणे.
३) क्षमा- मनातला क्रोध संपवून क्षमाशील व्हायचं.वर्षभर आपण कृतीनं,शब्दानं ज्यांना दुखावलं असेल तर त्यांची क्षमा मागायची.
४) अठमतप-अठम म्हणजे तीन दिवस संपूर्ण उपास!तीन दिवस सुर्योदयापासून सुर्योदयापर्यंत फक्त उकळलेले पाणी पिऊन रहावयाचे.ह्या तपस्येला अनन्यसाधारण महत्व आहे.
५) चैत्य परिपाटी-चैत्य म्हणजे जैन मंदिरे आणि परिपाटी म्हणजे परिभ्रमण! वेगवेगळ्या देवळात जाऊन चोवीस तीर्थंकरांच दर्शन घेणं. ही पांच प्रमुख कर्तव्ये पर्युषण पर्वात महत्त्वाची मानली जातात.
चौथ्या दिवसापासून'कल्पसुत्र' ह्या जैन धर्मातील पवित्र पोथीचे वाचन मंदीरात जैन साधू आपल्या प्रवचनातून सुरू करतात.
पाचव्या दिवशी पोथीतलं महावीरांच्याआईला गरोदरपणात पडलेल्या चौदा स्वप्नांविषयी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच सिध्दार्थराजांच्या वैभवाच्या वर्णनाच्या विषयीच्या कथांचं वाचन होतं.
सहाव्या दिवशी महावीरांच समग्र चरित्र सांगितलं जातं. सातव्या दिवशी पोथी पूर्ण होते.
सात दिवसांच्या साधनेच्या फलश्रुतीचा आठवा संवत्सरीचा दिवस! जो भाद्रपद शुद्ध पंचमीला असतो.ह्या दिवशी बहूतेक सर्वजण उपवास करतात.या दिवशी देवळात किंवा घराघरात जैन बांधव एकत्र येऊन अडीच तीन तासांची एक धर्मक्रीया करतात.ज्याचा उद्देशच आहे आत्मशुध्दी आणि सर्वांवर प्रेम!! त्यानंतर सर्वजण नमस्कार करून 'मिच्छामी दुकड्डम्' असे म्हणतात.मिथ्या मे दुष्कृत्यम्।म्हणजेच माझी दुष्कृत्ये,चुका विसरुन मला क्षमा करा.
असे हे क्षमा शिकवणारे जैनांचे पर्युषण पर्व मला तरी आत्मभान जागृत करणारे आहे असं मनापासून वाटतं.
असा हा भाद्रपद महिना, श्रावणातल्या सोनेरी उन्हाला आणि अश्र्विनातल्या पिवळ्या धमक उन्हाला जोडणारा एक सुंदर दुवा! फुलं-पत्रीनी सजणारे गौरी गणपती आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जातात.ऋषींची भाजी, उकडीचे मोदक, घावनघाटल अशा आजी-आईनी शिकवलेल्या पदार्थांमुळे सजणारी ताटं त्या त्या ऋतूत काय खावं ह्याचे धडे देतात.
ह्याच महिन्यात येणारा पितृपक्ष जो आपल्या पुर्वजां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा पंधरवडा असतो. आणि त्यामुळेच ह्या दिवसात शुभकार्य करू नये ही अंधश्रद्धा अजिबात बाळगु नये.कारण त्या पुर्वजांनी केलेले संस्कार, परंपरांचे स्मरण करून देणारा तर हा भाद्रपद महिना आहे.आणि तो सण, उत्सवांना घेऊन येतोच मुळी निसर्गाच्या हिरव्यागार पायघड्यांवरून!
निसर्ग तोच आहे पण आपण मात्र पर्यावरणाची काळजी न घेतल्याने सध्या ऋतुचक्र वेडंवाकडं फिरताना दिसतंय. जिकडे तिकडे उभ्या केलेल्या सिमेंटच्या जंगलांनी आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर केलेल्या वृक्षतोडीमुळे डोंगरांवरच्या दरडींच स्खलन होतंय, पूरस्थिती निर्माण होतेय आणि ह्यासाठी आपल्या प्रत्येकाला ह्या भाद्रपदात येणाऱ्या सार्वजनिक सणांच्या निमित्ताने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वत:ला शिस्त लावून घेतली पाहिजे.वृक्षवेलींशी दुरावलेल्या आपल्या नात्याला पुन्हा एकदा जपल पाहिजे.त्यानंतरच आपल्याला पावसाच्या नंतर भाद्रपदात दिसणाऱ्या इंद्रधनुष्याचे स्वागत करता येईल.

