Sunday, December 8, 2019

तिचं घर

किल्लीनी दार उघडताना तिला झालेला आनंद, तिची अधिरता हाताच्या थरथरण्यांनी तिला कळत होती.दार उघडलं तर एक चिमुकली चिमणी घरात अडकलेली तिला जाणवलं, घरभर ते पाखरू भिरभिरत होतं. हातातलं सामान सोफ्यावर ठेवून तिनं हाॅलची खिडकी उघडली. पंख्यावर बसलेली ती चिमणी भूर्रकन उडाली.उडताना तिनं प्रचंड चिवचिवाट केला.अडकल्यावरची घालमेल आणि सुटकेनंतरचा आनंद आठवून हिनंच मोकळा श्वास घेतला. तिला जाणवलं की ह्या पांच मिनिटांच्या नाट्यात आपण आपलं ठरवलेलं विसरलोच की! पर्स मधून रिपोर्ट काढून बघताना तिला 'आशय'ची तिच्या नवर्‍याची आठवण झाली.लग्नाला सात वर्ष झाली तरी घरात पाळणा हलत नव्हता! दोघांचे रिपोर्ट नाॅर्मल होते पण पाहिजे ते घडत नव्हतं.
     आज अचानक तिच्या आॅफिसमध्ये येऊन  शिल्पांनी तिच्या प्रेग्नसीचा रिपोर्ट दिला आणि ती हरखून गेली होती.शिल्पा व्यवसायानं डॉक्टर असली तरी तिची खूप जवळची मैत्रीण होती.त्यामुळेच मळमळ होत होती आणि अन्नावरची वासना गेली म्हणून ती कावीळीचा संशय येऊन शिल्पाकडे तपासायला गेली.आणि आज न राहवून ही आनंदाची बातमी सांगायला शिल्पा तिच्या आॅफिसमध्ये आली होती.
   तिनं ठरवलं होतं की गुपचूप आपण आशयच्या कपाटाच्या दरवाजावर रिपोर्ट चिकटवून ठेवूया. म्हणजे दुकानातून आल्यावर आशय कपडे बदलायला जाईल तेव्हा तो बघेल आणि....
    तिनं रिपोर्ट पर्स मधून काढून हृदयाशी धरला आणि ती बेडरूममध्ये गेली आशयच कपाट उघडच होतं.उघड कपाट बघून ती चरकली. कपाट रिकामं होतं.तिथे फक्त एक चिठ्ठी होती.
   " साॅरी, जानू,
     मी घर सोडून कांचन बरोबर कलकत्त्याला जातोय. मला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे. असं काकांच्या दुकानात वीस टक्क्यात काम नाही करायचंय.तू तुझ्या करिअरमध्ये दंग असल्याने तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये. त्यामुळेच सात वर्ष झाली तरी आपल्याला मुल होत नाहीयेत. आणि कांचनच माझ्यावर खूप प्रेम आहे.म्हणून मी तिच्या बरोबर जातोय. कायदेशीर कागदपत्रं काही काळानंतर पाठवीनच.
              ‌.                          आशय
    तिला काही कळतच नव्हतं.दोन्ही कागद हातात धरून ती तिथेच बसली. येवढा मोठा निर्णय आणि आपल्याला कल्पना सुध्दा आली नाही. त्या चिठ्ठीकडे बघून ती हमसाहमसी रडू लागली.आपलं इतकं दुर्लक्ष झालं ह्याच्याकडे का  आपण आपल्या कामात इतकं गुंतलो होतो की हा आपल्या हातातून निसटून जातोय ते कळलंच नाही. कलकत्त्याहून दुकानासाठी साड्यांचा माल आणणारी कांचन तिच्या घरी दोन तीनवेळा आली होती.पण हे असं कधी घडेल असं स्वप्नातसुध्दा आपल्याला वाटलं नाही.
    दारावर वाजणार्‍या बेलनी ती दचकली तिच्या मनात आलं 'मला आत्ता कोणी भेटू नका रे बाबांनो!' दार उघडल्याचा आवाज आला आणि'अरे देवा,आई आलेली दिसतेय कारण घराची एक किल्ली जवळ रहाणाऱ्या आईकडे असायची. तिच्या मनात आलं,आता आई तिच्या संतापी स्वभावाप्रमाणे बडबड सुरु करेल आणि अपेक्षेप्रमाणे तसंच आईचं सुरू झालं" तरी मी म्हणत होते,हा मुलगा अजिबात प्रामाणिक‌ नाही पण त्याच्या‌ प्रेमात वेडी झाली होतीस ना! एवढी साॅफ्टवेअर इंजिनिअर होऊन इतक्या मोठ्या कंपनीत नोकरी करतेयस आणि ह्याच काय तर एक वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण सोडलं आणि काकांच्या साड्यांच्या दुकानात बसला. तुला फसवायलाच जसा त्या काॅलेजात आला होता.आई संतापाने थरथरत होती.‌तिची पण चुक नव्हती. 
   "तुला कसं कळलं? तिनं चाचरत विचारलं.
   आई मोबाईल पुढे नाचवत म्हणाली" हा मेसेज वाच," तुमच्या मुलीला सांभाळा, मी तिला सोडून कांचन बरोबर कलकत्त्याला जातोय"ह्याला लाज नाही वाटत असा मेसेज पाठवायला!आईचा संताप आवरत नव्हता.आईच्या मागोमाग आशयची आई,काका, तिचा भाऊ-वहिनी सगळेच येऊन पोहचले.ह्या सगळ्या गोंधळात तिच्या मनात आलं "कसलं नशीब घेऊन येतंय माझं बाळ! मी कोणाला काही सांगू सुध्दा शकत नाहीये.
    चर्चा,सल्ले,रडारड झाल्यावर हळूहळू एकेक करत सर्वजण गेले. आई फक्त तिच्या जवळ राह्यली. थोडंसं कोणीतरी दिलेलं खाऊन आईचा थकल्यामुळे डोळा लागला.
     ती हळूहळू जड पावलांनी हाॅलमध्ये आली. तिला ती घरात आली तेव्हा घरांत अडकल्यामुळे कासावीस झालेली चिमणी आठवली. तिनं सहज खिडकीकडे बघितलं.खिडकीच्या कोपऱ्यात पडद्याआड झाडं ठेवायच्या फळीवर तिला चोंच मानेत घालून बसलेली तीच चिमणी दिसली. जवळ जाऊन बघायला ती उठली आणि तिची चाहूल लागून ती जागेवरच फडफडली. काचा उघडलेल्या होत्या पण ती उडाली नाही.तिथंच  बसून राह्यली." बस बाई, आत्ता तरी तुझीच सोबत आहे." असं म्हणत ती सोफ्यावरच आडवी झाली.
    सकाळी तिला जाग आली ती चिवचिवाट ऐकू आल्यामुळे आणि त्या चिमणीसह एक चिमणा पण त्या फळीवर होता. दोघांचे काहीतरी बोलणं सुरु होतं. तिनं हातानं 'हूश्श' करत उडवायचा प्रयत्न केला.पण दोघं ढिम्म हलले नाहीत आणि अचानक 'जातो बाई हाकलवू नकोस' असं म्हणत जावं तसा आवाज करत दोघेही उडाले.
  त्यांची ती भरारी बघून तिला एकदम फ्रेश वाटलं. आई पण उठून चहा घेऊन तिच्याजवळ उभी होती. आईनं विचारलं" चार दिवस रजा घेतेयस ना?आॅफिसमध्ये कळवून टाक तसं!
    तिनं बाहेर उडून आकाशात झेप घेतलेल्या पक्षांच्या दिशेकडे बघत म्हटलं" नाही ग, घरी बसून काय करायचं! कामात मन तरी रमेल आणि आमच्या आॅफिसमध्ये खूप व्यावसायिक तरीही मोकळं वातावरण आहे. मी  जाते आॅफिसला! तिनं निर्णय घेतला होता.
   चार दिवसांनी तिनं आईला तिच्या प्रेग्नसीची बातमी सांगितली. आई हळवी होऊन म्हणाली" काय ग बाई त्या लेकराचं नशीब. तुझ्या नशिबातही बाबांचं प्रेम नव्हतं आणि  तुझ्या पोराच्या नशिबातही असलं काहीतरी आलंय! तुझ्या बाबांचा थोडातरी सहवास तुला मिळाला पण त्यांच्या आजारपणा पुढं आपलं काही चाललं नाही.
     ती पण आईचा हात हातात घेऊन म्हणाली  "अगं, बाळाचं नशीब मी घडवेन.पण तू आता माझ्या घरीच रहाशील? "अगं, हे काय विचारतेस, मी दादाला केव्हाच सांगितलंय, आणि आता तर काय बाळासाठी मला इथं रहावंच लागेल ना!आई चार दिवसांनी जरा खुषीत दिसली.
       त्या चिमणीनी तिच्या हाॅलमधल्या खिडकीतली ती जागा स्वत:च्या घरट्यासाठी नक्की केली होती.दोघंही घरट्यासाठी काडी काडी जमवायला धावपळ करू लागले होते.आईला त्यांच्या चिवचिवाटाचा त्रास व्हायचा पण ती मात्र त्यांच्या घर बांधणीत मनापासून सामील झाली होती.आईदेखील त्यांच्यासाठी पाणी, तांदूळ असं काही ठेवू लागली होती.
      'तिचं घर' तयार झालं आणि चिऊताईंनी चार अंडी घातली. ती खिडकीवर चढून बघायला लागली की आई ओरडायची. पण ती चिमणी जणू तिची मैत्रीण झाली होती. खिडकीत बसून ती तिच्या चिऊलीशी गप्पा मारायची. ती आईला म्हणायची " अगं, हल्ली मला त्या चिमणीची भाषा कळते.अंडी उबवायला बसलेल्या चिमणीच्या आजूबाजूला त्या चिमण्याच्या घिरट्या सुरू होत असत. ते बघितलं की तिला आशयची आठवण यायची. पण तो तर तिला पूर्ण विसरुन गेला होता.त्याची आई मात्र आवर्जून तिला भेटायला यायची.
   एक दिवशी सकाळी छोट्या पिल्लांच्या हळूवार आवाजानं तिला जाग आली. ती धावत खिडकी जवळ गेली आणि त्याचवेळी तिच्या पोटातल्या बाळानं अस्तित्वाची जाणीव करून दिली.तिच्या अंगावर काटा उभा राहिला.आपल्या घरट्यात त्या चार पिल्लांना पंखाखाली घेऊन बसलेली तिची चिऊली तृप्त नजरेनं तिच्याकडे बघत होती.
      महिन्याभरात तो चिमणा यायचा बंद झाला.ते तिला जाणवलं कारण तेव्हाच आशयनी घटस्फोटाचे कागद पाठवले होते.तिनं ते शांतपणे वाचून  सही करून परत पाठवले.फक्त हे घर आपल्या दोघांच्या नावावर आहे ते मी माझ्या एकटीच्या नावावर करून घेणार आहे त्यासाठी ‌मदत कर कारण घराचे हप्ते मीच भरतेय. इतकंच कळवून तिनं मोकळा श्वास घेतला होता.
    एका संध्याकाळी ती पिल्लं घरट्यातून बाहेर आली चिऊली त्यांना अनिमिष नजरेनं बघत होती. ती देखील पिल्लांची धडपड बघायला जवळ गेली. आई ओरडली " अग त्यांच्याजवळ जाऊ नकोस ती चिमणी चोंच मारते." मला नाही मारणार" तिनं हसत हसत म्हटलं. पिल्लं खाली आली होती.तिनं खिडकीत पेपर पसरला पिल्लं त्यावर बसल्यावर तिनं पेपर घरट्यात ठेवला.चिऊली तर अक्षरशः घरभर उडत आनंद व्यक्त करत होती.
बघता बघता ती पिल्लं तिथल्या तिथंच उडायला लागली.त्यांच्यासाठी खाऊ आणणं वगैरे कामात चिऊली खूप बिझी होती. एका सकाळी त्यातल्या दोन पिल्लानी आकाशात झेप घेतली आणि परत घरट्यात परतली. हे सगळं बघताना तिला वाटलं आता ही आईला सोडून उडून जाणार.पण चिऊली तर आनंदाने त्यांचा हा भराऱ्यांचा खेळ बघत होती.तिला चिऊलीच्या स्थितप्रज्ञतेचं कौतुक वाटलं.तिच्या मनात आलं" आपण माणसं फार गुंततो एकमेकांत. 
   सगळी पिल्लं उडून गेल्यावर चिऊली मधूनच यायची घरभर उडायची की तिला कळायचं ही भेटायला आलेय.आई म्हणायची सुध्दा" काय म्हणाली तुझी चिऊली? म्हणाली" तुझं नांव सुध्दा माहित नाही  पण सगळ्या 'तीं'च दु:ख एकच! तेव्हा पुरुषी चिमण्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष कर.आणि मजेत जग! आता आपण दोघीही तुझ्या पिल्लाची वाट बघुया. 
"इतकं बोलते का ती‌ तुझ्याशी? आई हसत म्हणायची.
  काही दिवसांनी आई ते घरटं झाडूनी काढायला लागली. ती धावत आली आणि म्हणाली " अगं,आई "तिचं घर" माझ्या कठीण दिवसात  मला कसं जगायचं शिकवत होतं! ते 'तिचं घर' मला जपून ठेवायचंय.
      आईनी  'तिचं घर' हलक्या हातानं खाली काढून शोकेसमध्ये ठेवलं.जगण्याच बळ देणारी एक आठवण छानशी जपली गेली होती.
                 ललिता छेडा

भय इथलं

डोळे उघडावे तरी उघडत नव्हते. शरीरभर वेदनेच्या पलिकडे काहीतरी पसरलं होतं. फक्त श्र्वास सुरू आहे म्हणून आपण जिवंत आहोत हे तिला जाणवत होतं.इतक्यात तिच्या डोक्यावरून हात फिरला."आजी" तिनं स्पर्श ओळखला होता.तिला उठून आजीच्या गळ्यात पडून जोराजोरात रडावसं वाटलं. पण शरीरभर असलेल्या नळ्या आणि ताकद नसलेल्या शरीरानी तिला साथ द्यायला नकार दिला होता.पण तिच्या नकळत डोळ्यांतून पाणी वाहू लागले. "रडू नकोस बायो, मी आहे ना! आजी रडत बोलत होती आणि लगेच नर्सनी तिला बाजूला करून डाॅक्टरांना‌ हांक मारली. डाॅक्टर लगेच धावतच आले. " डाॅंक्टर, पेशंटच्या डोळ्यांतून पाणी येतंय.हातपण हलला"नर्स रिपोर्ट करत होती आणि डॉक्टर तिच्या डोळ्यात बॅटरीचा प्रकाश मारु लागले."आजी, तुमची नात थोडीशी शुध्दीवर येतेय". तुम्ही जरा बाहेर बसता,मला जरा तपासायला हवंय! डाॅक्टर आजीला समजावत होते." नको रे बाबा, मी इथे बसलेय ह्या कल्पनेनेसुध्दा तिला बरं वाटेल! तिलाही उठून डॉक्टरांना" आजी मला जवळ हवी आहे, तिचं नुसतं असणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे.असं सांगावस वाटलं!! पण ह्या सगळ्याचा परिणाम होऊन तिला धाप लागली. आणि नर्सनी आजीना बाहेर काढलं.
     डाॅक्टर काहीतरी ट्रीटमेंट देत होते आणि तिलाही ग्लानी येऊ लागली होती. इतक्यात डाॅक्टर नर्सला म्हणाले" काल रात्री अॅडमिट झाल्यापासून जवळजवळ पंधरा सोळा तासांनी पेशंटनी रिस्पाॅन्स दिलाय. नशीबानं थोड्याच वेळात मंत्रीसाहेबही येताहेत. ते काय पेशंटचे वडील आहेत म्हणे" सावत्र वडील आहेत."नर्सनी लगेच उत्तर दिलं. ती त्याच गावातली असल्यानं  नर्सला सगळंच माहित होतं.
       तिची पुन्हा शुध्द हरपली होती.
    बाहेर बसलेल्या आजींच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. त्यांच्या एकुलत्या एक लेकीची ही एकुलती एक मुलगी! 
     आजींच्या मुलीनं तिच्या पहिल्या नवर्‍याला सोडून आल्यावर गावातल्याच नगरसेवकाबरोबर लग्न केलं होतं.पुढे नवरा मंत्री झाल्यावर आजींची मुलगी  मुंबईला निघून गेली होती आणि तिनं लेकीला आजींकडे सोडलं होतं.आजींना पण नंदिनीचा त्यांच्या नातीचा खूपच लळा होता.
      काल काॅलेजला शहरात बसनी जाणारी नंदिनी रात्र झाली तरी आली नाही त्यामुळे काळजीनं आजी रात्रभर झोपल्या नव्हत्या. सकाळी कोणीतरी तिला गावातल्याच इस्पितळात दाखल केल्याच सांगत आलं आणि आजी धावतच तिथं पोचल्या. तिची अवस्था बघून काय झालं असेल त्याची अनुभवी आजींना पूर्ण कल्पना आली होती.सुदैवानं नव्यानंच सुरू झालेल्या गावातल्या अद्ययावत इस्पितळात शिकाऊ पण चांगला  डॉक्टर जाॅईन झाला होता.
     आजी उगीचच काहीतरी विचार करत होत्या.
    डाॅक्टर खोलीतून बाहेर आले आणि आजींजवळ बसले.
    "कोणी आणि कां केली ही अवस्था माझ्या सोन्यासारख्या पोरीची? आजी डॉक्टरांचा हात धरून विचारत होत्या.
    " नाही हो माहित मला! पहाटे तिला कोणीतरी इस्पितळाच्या दारात ठेवून गेलं.अतिशय वाईट अवस्था होती तिची...आजी खूप धीरानं आपल्याला तिला बरं करायचंय,सर्वात पहिलं आपल्याला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायला हवी. मी त्यादृष्टीनं सगळे कागद तयार करतो. आजी खूप मोठी लढाई लढायचीय आपल्याला" डॉक्टर आजींना समजावत होते.
   " खूप धीराची आहे रे मी, पण हिची अवस्था बघवत नाहीये, ही बरी व्हायला हवी! आजींना रडू आवरत नव्हतं.
     हळूहळू गावातली मंडळी जमा व्हायला लागली होती. पोलीसांच्या चकरा पण सुरू झाल्या होत्या.कोणीतरी नंदिनीला सरपंचाच्या मुलाबरोबर गावातल्या देवीच्या देवळाकडे जाताना बघितल्याचं बोललं.आणि तपासाची चक्रे फिरू लागली.
     आता नंदिनीला पुन्हा जाग येत होती.तिनं डोळे उघडले आणि नर्सनी ते बघितलं. आनंदानं तिनी डाॅक्टरांना हांक मारली. आजी,डाॅक्टर सगळेच धावत आले. तिच्या डोक्यावर हात ठेवून " कळतंय मी काय बोलतोय ते? असं डॉ.नी विचारल्यावर नंदिनीनी मान हलवली. व्वा,आता काही विचार करु नकोस, लवकर बरं व्हायचंय ना आपल्याला! इतक्यात बाहेर कसली तरी गडबड झाली डॉक्टर लगेच बाहेर गेले. 
       बाहेर मंत्रीमहोदय त्यांच्या बायकोबरोबर गाडीतून उतरत होते. नंदिनीची आई कोणाशीही न बोलता नंदिनीच्या खोलीत गेली. तिला बघून नंदिनींनी डोळे मिटून घेतले. तिला आत्ता कोणाशीही बोलायचं नव्हतं. 
   नंदिनीला आईला बघितल्यावर ६/७ वर्षांपूर्वी मुंबईला आईकडे गेलो होतो तेव्हा निर्भयासाठी आपण आईबरोबर जाऊन मेणबत्त्या लावल्या होत्या त्यांची आठवण झाली.त्यावेळी लावलेल्या मेणबत्त्यांचा अर्थ कळलाच नव्हता पण आज इतक्या वाईट पद्धतीनं तो अर्थ कळतोय आणि त्यातला फोलपणा पण कळतोय ते सर्व आठवून नंदिनीला उन्मळून रडायला आलं.
"नको ना रडू, आम्ही आहोत तुझ्याबरोबर" आई बोलत होती तिनं आईकडे अगतिकपणे बघितलं. 
     पण आई, जेव्हा माझ्या शरीराची विटंबना होत होती तेव्हा तर माझ्याबरोबर कोणीच नव्हतं ना!अगदी तुझा परमेश्वरसुध्दा...तिचा आतल्याआत आक्रोश सुरू होता.
    मंत्री आल्यामुळे असेल किंवा ती शुद्धीवर आली आहे हे कळल्यामुळे असेल पोलिस इन्सपेक्टर पण आईच्या मागोमाग आले.त्यांच्याबरोबर डॉ.पण होतेच. आत आल्यावर डाॅक्टरांनी "पेशंट अजिबात बोलण्याच्या स्थितीत नाही प्लीज कोणीही तसा प्रयत्नही करु नका" असं म्हटलं.
     "डाॅक्टर, पेशंट थोडासा शुध्दीवर येईल तर मला लगेच बोलवा. आमचा एक पोलिस इथं खोलीबाहेर बसेल"इन्सपेक्टर थोड्या कडक आवाजात म्हणाला.
     नंदिनीची तब्येत मात्र दिवसेंदिवस बिघडतच होती. पण तिनं सरपंचाच्या मुलांनी जगननी "आजींनी तुला देवळात बोलावलंय असं खोटं सांगून" बस स्टॅण्ड वरुन देवळाच्या मागील बाजूस नेऊन मित्रांच्या ताब्यात दिलं आणि स्वत: पळून गेला. त्यातील मुंबईहून आलेल्या मित्रांनी बलात्कार केला असल्याचे सांगितले. पण सांगायच्या आधी मी हे सगळं फक्त आजीला सांगेन अशी अट घातली. तिनं  सांगितल्यामुळे गुन्हेगारांना पकडलं गेलं.आजी एक क्षणसुध्दा तिला स्वत: पासून दूर ठेवत नव्हत्या.
   मंत्र्यांच्या पत्रकार परिषदा सुरू होत्या.दुर्दैवानं तिच्या खोलीच्या मागेच इस्पितळाची कन्सल्टिंग रूम होती.आणि मंत्रीमहोदयांचा मुक्काम तिथेच होता. " आमच्या विरोधकांनी हे केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असली वाक्यं ऐकून दोन दिवसांनी आजींनी त्यांना हात जोडून मुंबईला जायचची विनंती केली. ते देखील लगेच गेले. आई मात्र मनापासून केस व्हावी ह्यासाठी धावपळ करत होती.
    " आजी, तुमच्या नातीला जगण्याची इच्छाच उरली नाहीय! मी उत्तम उपचार करतोय पण ती रिस्पाॅन्सच देत नाहीय! डाॅ. हताशपणे एका सकाळी म्हणाले आणि आजी "असं नको म्हणूस  पहिल्या दिवशी तूच मला लढाईला तयार केलंस ना आणि आता असा हरू नकोस.त्याचा हात धरून म्हणाल्या. पण दोघांनाही भविष्य कळलं होतं. जड पावलांनी दोघं नंदिनीच्या खोलीत आले. नंदिनी जोराजोरात श्र्वास घेत होती. तिला and सपोर्ट सिस्टीम लावायची तयारी सुरू होती.
     "काय शिक्षा देणार असं वागणार्‍या शैतानांना? आणि त्यांना मिळालेली कोणतीही शिक्षा ह्या मुलींना न्याय देवूच शकत नाही. पण आजीचा सात्त्विक संताप नंदिनी पर्यंत पोचतच नव्हता. तिनं दु:खानी घेतलेला मोठा श्र्वास बाहेर सोडलाच नाही. बळींच्या संख्येत अजून एकानी वाढ झाली. गावात मेणबत्त्या लावल्या गेल्या.
    थोड्याच दिवसात गावातली अस्वस्थता संपून परिस्थिती पूर्वपदावर आली.फक्त नंदिनीचा विषय निघाला की सगळेजण  हळहळतात.
  पण भय मात्र इथलं संपत नाही...
          ललिता छेडा.
     
       
.

Monday, October 7, 2019

पाऊलखुणा २

                               आठवणीतली प्रवास गाथा...
      


    सहज वाचनात आलं की २७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन असतो. ते वाचल्यावर शरीरापेक्षा मनच जास्त प्रवास करु लागलं आणि  केलेले देश-विदेशातले प्रवास एखाद्या चलचित्राप्रमाणे डोळ्यासमोर सरकून गेले.पण जास्त आठवले लहानपणी केलेले प्रवास!
         त्याकाळी मे महिन्याची सुट्टी लागली की फलटणला आत्याकडे आणि सांगलीला आजोळी जायचं नक्की असायचं. सगळे प्रवास अर्थात एस.टी.नी व्हायचे. मला एसटी खूप लागायची त्यामुळे माझा संपूर्ण प्रवास आईच्या मांडीवर झोपूनच व्हायचा. आता विचार करता मनात येतं' 'आठ तास मला मांडीवर घेऊन आईला किती  अवघडून जात असेल' पण एकदाही तिनं तसं मला जाणवून सुध्दा दिलं नाही.आपण आई झालो की आपली आई आपल्याला उमगायला लागते.
    गावाला जायचं ठरवलं की आमची एक लाल बॅग होती.ज्यात माझे आणि दादांचे(माझे वडील) कपडे भरले जायचे,एक छोटासा आईनं घरी शिवलेला‌ होल्डाॅल असायचा ज्यात आईच्या चार नऊवारी साड्या,इतर काहीबाही बांधलं जायचं.एक घरीच शिवलेली चेक्सचं डिझाईन असलेली पिवळ्या रंगाची कप्प्यांची पिशवी होती.ज्यात प्रवासात लागणारी सामग्री भरली जायची.कुठेही जायचं तर आमचं सामान हेच...
      आज फोर व्हीलर मधून फोर व्हीलची बॅग घेऊन  वीक एण्डला औटींगला जाणाऱ्यांना ही वर्षातून एकदा गावाला जाण्याची गंमत कळणारच नाही.
     उन्हाळ्याची सुट्टी लागली की फलटणला सर्वात पहिलं जायचं.हा अलिखित नियम होता.दादांची प्रत्येक गोष्ट शिस्तीत आणि आखीवरेखीव असायची.त्यामुळे महिनाभर आधीपासून पत्रव्यवहार व्हायचा.कुठे किती दिवस रहायचं, किती खर्च येईल हे सर्व आधी लिहून तयार असायचं.
       फलटणला पोचलो की आत्या दारात भाकरतुकडा ओवाळून टाकायची. इतकं छान वाटायचं जणू प्रवासाचा शीण काढून ती दाराबाहेर घालवतेय.
      फलटणचे दिवस पटकन संपायचे. आत्याचा वाडा मोठा होता.दिंडी दरवाजातून आत आलं की डाव्या बाजूला दिवाणखाना, समोर पडवी,माजघर, झोपाळ्याची खोली,झोपाळ्यासमोर देवघर!देवघराच्या‌ बाजूला स्वैपाकघर, झोपाळ्याच्या मागे तुळशीचं अंगण जिथे एक छोटीशी बाग!! संध्याकाळी त्या झाडांना पाणी घालायचं,आत्या मग तुळशीवृंदावनाशी दिवा लावून आरती म्हणायची.इतक्या आरती असताना ती एकच आरती म्हणायची"आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा" इतकं प्रसन्न वाटायचं! जितकी प्रसन्न संध्याकाळ तितकीच सुंदर सकाळ दोन्ही अंगणात सडा घालायचा,बंब पेटवणाऱ्या आतेभावाशी उगीच वाद घालायचा, चहा पिताना वर्तमानपत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या आत्याला वाचून दाखवणारे आत्याचे यजमान भाऊसाहेब!‌ते इतकं समजावून सांगायचे की हातानं काम करत असले तरी सर्वांचे कान मात्र‌ भाऊ आणि आत्याच्या संवादाकडे  असायचे. कारण आत्या अगदी तन्मयतेने त्या बातम्या ऐकायची. त्यानंतर शेजारच्या नानाई भाजी निवडून द्यायला यायच्या,त्यांचा मुलगा नाना म्हणजे आत्याच्या घरचा' नारायण'च होता.
     आत्याचं दुसरं बिऱ्हाड दातिरांच, त्यांच्या तीन मुली माझ्या वयाच्या आणि एक थोडी लहान.त्यामुळे माझी सगळी दुपार त्यांच्या घरात जायची.मी सागरगोटे,टिक्कर तिथेच शिकले. आज साठ वर्ष झाली पण सगळ्या आठवणी लखलखीत आठवतात.कारण ह्या आठवणी मनात खोलवर जपल्या गेल्यात.
        फलटणच्या दिवसात तिथलं रामाचं मंदिर,आत्याच्या सासरचं घर, आठवडयाचा बाजार हे सगळं व्हायचंच.
       सांगलीला मात्र दादांच्या पांच मामांच एकत्र कुटुंब! माझ्या आजीच्या मृत्यूनंतर दादा सांगलीला
मामांकडे आले आणि खाडिलकरांच्या घरच्या मोठ्या भावाचा मान सर्वानींच त्यांना‌ दिला.तो सांगलीचा वाडा एखाद्या सिनेमा सारखा होता.खूप कॅरेक्टरस्! प्रत्येकाचं एक वेगळेपण आणि ते जपण्यासाठी त्या प्रत्येकाची धडपड सुरू असायची.ह्या पांच भावांच्या तीन बहिणी,त्यातली एक माझी आजी, आणि ‌दुसर्‍या दोघीतली एक पुन्हा एकदा ‌सिनेमातल्या पाॅवरफूल नणंदेसारखी कमरेला किल्ल्या असणारी!! सगळ्या घरावर हिचं वर्चस्व आहे असं समजणारी.कारण मोठ्या दादामामांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांची मुलं आणि एका दिव्यांग मुलीची जबाबदारी बालविधवा असलेल्या ह्या बहिणीनी उचलली होती. तिचं वेगळेपण म्हणजे बोलताना 'माणूस" ह्या शब्दाला जमतील तेवढे विभक्ती प्रत्यय ती लावायची.हे सगळं तेव्हा कळत‌ नव्हतं पण नंतर हळूहळू कळू लागलं.पण आज मागे वळून पाहताना वाटतं " स्वत:च असं कोणी नसताना भावाचा संसार आपला मानून चालताना कदाचित तिच्या हातून काही चुका झाल्या असू शकतील. आता त्या विसरायला हव्यात.तिची माझ्या लक्षात राह्यलेली एक आठवण म्हणजे "माझ्या एका काकूला तिनं हाक मारली. काकू विहीरीवर पाणी भरत होती. तिला बहुतेक ऐकून आलं नसावं, हिने रागाने जोरात हांक मारून म्हटलं" निर्मला, लगेच हातातलं काम टाकून ये" काकूंच्या हातात भरलेली घागर होती, तिनं दिली सोडुन विहीरीत! मोठा आवाज झाला आणि सर्वांना वाटलं काकू पडली की काय? दुसऱ्याच मिनीटात काकू तिच्या समोर उभी राहून विचारतं होती"बोला, काय काम आहे? लगेच सगळ्यांना कळलं काकूंनी काय केलंय ते!! अजूनही काकूंचा तो स्थितप्रज्ञ चेहरा डोळ्यासमोर आहे.
   सांगलीच्या घरातली माझी लाडकी आजी म्हणजे दादांच्या मामी आणि जुन्या जमान्यातल्या सुप्रसिद्ध गायिका इंदिराबाई खाडिलकर ह्या होत्या. त्यांचं हळूवार बोलणं, गाणं गुणगुणं खूप छान वाटायचं.
  सांगलीच्या घरातलं दादांच्या गोष्टी सांगणं हा एक सर्वाचाच रात्रीचा आवडता कार्यक्रम असायचा. रोज एकदा तरी"तिच ग मी" ही गोष्ट व्हायचीच. आणि प्रत्येकवेळी नव्यानं मुलांनी घाबरलं पाहिजे ही दादांची जबाबदारी असायची. आणि ते ती मस्त पार पाडायचे. सांगलीच्या घरातल्या स्वैपाकघरांत भाकऱ्या करणाऱ्या उमामामी अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत. सांगलीहून अनेकदा मिरज,उगार, रहिमतपूर असं जायचं असायचंच अर्थात लोकल किंवा ट्रेननीच‌ हा प्रवास व्हायचा.
ह्या सगळ्या प्रवासांनी मला नातं जपायला शिकवलं!
   आठवणीतल्या प्रवासातला एक  म्हणजे महाबळेश्वरच्या एम.टी.डी.सी.त माझ्या इंदूआत्यानी एक महिन्यासाठी रूम घेतली होती. आणि आम्हाला बोलावलं होतं तो .त्याकाळी स्वत:पूरता आनंद घ्यायचा असं नसायचं. सर्वजण त्या आनंदात सहभागी व्हावे असं वाटायचं. आणि म्हणूनच त्या महिन्यात आत्याच्या यजमानांनी बऱ्याचजणांना महाबळेश्वरला बोलावलं होतं.
     तिथल्या वास्तव्यातल्या दोन गोष्टी मला कायम आठवतात एक म्हणजे आईला त्या चार दिवसांत आयतं जेवण मिळालं ह्याचं खूप अप्रुप वाटलं होतं.आणि हे ती परत आल्यावर बरेच दिवस सर्वांना सांगत होती.आणि दुसरं म्हणजे आम्ही प्रतापगडावर जायचं ठरवलं आणि मला आदल्या रात्री खूप ताप आला.वरती जाण्यासाठी कडेवर उचलून घ्यायला दहा-बारा रूपये देऊन बाई ठरवली. पण मी तिला हात सुद्धा लावून दिला नाही. आणि ‌गड मी दादांच्या किंवा आत्याच्या यजमानांनाच्या कडेवर बसून,कधी दोन्ही आतेभावांनी बखोटीला धरून झोपाळा करत वरती चढले. आणि उतरताना मात्र मी आपली आपली उतरले. घरी आल्यावर त्या बाईला दिलेले पैसे कसे फुकट गेले ह्यावर चर्चा सुरू झाली आणि आत्याचे यजमान अगदी सहज म्हणाले" ती आजारी असताना सुध्दा प्रतापगडावर चढून गेली.हे महत्त्वाचं आहे तेव्हा ह्यावर चर्चा नका करू... नकळतपणे होणारे संस्कार असे होतात.मी अजूनही ते वाक्य विसरले नाही.
त्यानंतर प्रवास खूप झाले पण सहजीवन शिकवणारे,नाती जपणारे प्रवास हे फक्त लहानपणीच झाले असं मनापासून वाटतं.म्हणूनच...
माझं हरवलेलं बालपण पुन्हा एकदा जगायला लावणारी...
     अशी ही माझी आठवणीतली प्रवास गाथा...
                                                                                                                                                    -  ललिता छेडा.

Thursday, September 5, 2019

पाऊलखुणा-१

           । त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी।
  
       श्रावणसरीत न्हातच भाद्रपद येतो आणि गणरायाच्या आगमनाची चाहूल लागते.सत्-चित्-आनंदरुपी अशा गणेशाची मूर्ती आणताना सर्वांनाच  जाणवत असतं की हिची ज्ञान आणि विज्ञान अशी दोन रूपे आहेत.उत्सवाच्या निमित्तानं अथर्वशीर्ष कानावर पडत आणि हे वाक्य सतत मनात रूंजी घालत रहातं.त्यामुळेच विज्ञानाच्या जोडीनं येणारं ज्ञानच खरं आहे हे मनातल्या मनात नक्की होत जात...

     माझ्या माहेरी गणपती येत नसल्याने माझ्यासाठी लहानपणी गणेश उत्सव म्हणजे गणेश दर्शनासाठी आईसोबत तिच्या मैत्रीणींच्या घरी जायचं आणि दादांबरोबर (वडिलांना मी दादा म्हणायचे) गिरगाव,परेल मधले मोठे मोठे गणपती बघायला जायचं येवढाच होता. तेव्हा हल्ली सारखी नवसाची वेगळी, व्ही.आय.पी.वेगळी, फक्त मुखदर्शन अशा रांगांची व्हरायटी नसायची. दुपारच्या वेळी मंडपात दहा बारा पोरं खेळत असायची. त्यातलाच एक धावत येऊन प्रसाद द्यायचा.आजुबाजुचे दुकानदार ‌सुखेनैव व्यापार करायचे.हल्ली मात्र अफाट गर्दीमुळे म्हणे त्या दुकानदारांना दहा दिवस दुकानं बंद ठेवावी लागतात. त्यावेळी शांतपणे दर्शन घेतलं की मुर्ती भोवतालच्या देखाव्यांविषयी चर्चा, आणि ऐतिहासिक गोष्टींवर आधारित तो देखावा असेल ती गोष्ट ऐकत पुढच्या गणपतीला जायचं असं सगळं साग्रसंगीत दर्शन व्हायचं. दादांना गोष्टी सांगायला खूप आवडायचं.आणि ते त्या सांगायच्याही रंगवून. 

माझा मात्र आवडीचा दिवस म्हणजे 'अनंत चतुर्दशी' कारण त्यादिवशी आम्हाला खारला रहाणार्‍या माझ्या आतेभावाकडे दरवर्षी अनंताची पूजा असायची.पूजेच्या तयारीपासून गुरूजींच जेवणं आटपेपर्यंत सर्व जबाबदारी आत्यांनी माझ्या आईला दिलेली होती.आणि आई ती अगदी मनापासून आणि आनंदाने निभवायची.

    त्या आतेभावाचं घर खारला एका मोठ्या, देखण्या बंगल्याच्या आऊट हाउस मध्ये होत. बंगल्या भोवतालची बाग, एक मोठा हौद, बागेत बसायला संगमरवरी बाकं, सुंदर झोपाळा त्यामुळेच माझं आकर्षण म्हणजे पूजा होईपर्यंत त्या बागेत मनसोक्त हूंदडायचं.त्याशिवाय गेटजवळ एक चौथरा होता त्यावर बसलं की पूर्ण रस्ता दिसायचा.त्या गल्लीत अनेक सिनेसृष्टीतील कलाकारांचे बंगले होते.आणि तो दिवस सुट्टीचा असल्यानं अनेकदा पुढच्या गल्लीतल्या खार जिमखान्यात जाणार्‍या अनेक सुप्रसिद्ध नटनट्यांच दर्शन होत असे. त्यांना तसं बघताना मजा वाटायची. ह्या सगळ्या आठवणी पन्नास वर्षांपूर्वीच्या आहेत त्यामुळे आत्तासारखी सिक्युरिटी, महागड्या गाड्या असं काहीच नव्हतं.

    जेवणं झाली की आम्ही लगेच परळला घरी परतायचो.कारण आमच्या दारावरुन विसर्जनाच्या मिरवणुकी सुरू व्हायच्या! आठवणीतली मिरवणूक म्हणजे राजकमलच्या गणपतीची! आणि त्या मिरवणूका बघायला पाहुणे यायचेच.आई पुन्हा संध्याकाळच्या तयारीला लागायची.आता विचार केला तर वाटतं इतकी ऊर्जा हिच्याकडे कुठुन यायची.पुन्हा थकवा नाही,स्वैपाकाचं टेन्शन नाही. मला वाटतं कारण एकच तिला सर्वांना जेवू घालायला आवडायचं.

     लग्नानंतर श्रावण-भाद्रपदातला 'पर्युषण' हा सण मी कच्छी जैनांची सुन झाल्यामुळे कळला.आणि स्वभावाप्रमाणे एकंदरच जैन धर्म आणि पर्युषण पर्व ह्याबद्दल खूप वाचन केलं. त्यामुळे मला कळलेला पर्युषण म्हणजे ज्ञान, दर्शन आणि संयमसाधना ह्याचं महत्त्व जाणवून देणारा जैन धर्मातील खास सण हे कळलं.हे पर्व आठ दिवस असल्याने पर्युषणाला 'अठ्ठाई' असे सुध्दा म्हटलं जातं.यापर्वात पाच महत्त्वाची कर्तव्य मानली जातात.

१) अहिंसा- ज्यात निष्क्रिय 'अहिंसा' म्हणजे कोणत्याही जिवाला न मारणे आणि सक्रिय'अहिंसा' म्हणजे एखाद्या जिवाला वाचवणे.

२) साधर्मिक भक्ती- प्रत्येकानं आपल्या आजूबाजूला रहाणाऱ्या सहधर्मिकाविषयी काळजी घेणे,आदर ठेवणे.

३) क्षमा- मनातला क्रोध संपवून क्षमाशील व्हायचं.वर्षभर आपण कृतीनं,शब्दानं ज्यांना दुखावलं असेल तर त्यांची क्षमा मागायची.

४) अठमतप-अठम म्हणजे तीन दिवस संपूर्ण उपास!तीन दिवस सुर्योदयापासून सुर्योदयापर्यंत फक्त उकळलेले पाणी पिऊन रहावयाचे.ह्या तपस्येला अनन्यसाधारण महत्व आहे.


५) चैत्य परिपाटी-चैत्य म्हणजे जैन मंदिरे आणि परिपाटी म्हणजे परिभ्रमण! वेगवेगळ्या देवळात जाऊन चोवीस तीर्थंकरांच दर्शन घेणं. ही पांच प्रमुख कर्तव्ये पर्युषण पर्वात महत्त्वाची मानली जातात.
चौथ्या दिवसापासून'कल्पसुत्र' ह्या जैन धर्मातील पवित्र पोथीचे वाचन मंदीरात जैन साधू आपल्या प्रवचनातून सुरू करतात. ‌

  पाचव्या दिवशी पोथीतलं महावीरांच्याआईला गरोदरपणात पडलेल्या चौदा स्वप्नांविषयी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच सिध्दार्थराजांच्या वैभवाच्या वर्णनाच्या विषयीच्या कथांचं वाचन होतं.‌
सहाव्या दिवशी महावीरांच समग्र चरित्र सांगितलं जातं. सातव्या दिवशी पोथी पूर्ण होते.

  सात दिवसांच्या साधनेच्या फलश्रुतीचा आठवा संवत्सरीचा दिवस! जो भाद्रपद शुद्ध पंचमीला असतो.ह्या दिवशी बहूतेक सर्वजण उपवास करतात.या दिवशी देवळात किंवा घराघरात जैन बांधव एकत्र येऊन अडीच तीन तासांची एक धर्मक्रीया करतात.ज्याचा उद्देशच आहे आत्मशुध्दी आणि सर्वांवर प्रेम!! त्यानंतर सर्वजण नमस्कार करून 'मिच्छामी दुकड्डम्' असे म्हणतात.मिथ्या मे दुष्कृत्यम्।म्हणजेच माझी दुष्कृत्ये,चुका विसरुन मला क्षमा करा.

   असे ‌हे क्षमा शिकवणारे जैनांचे पर्युषण पर्व मला तरी आत्मभान जागृत करणारे आहे असं  मनापासून वाटतं.

    असा हा भाद्रपद महिना, श्रावणातल्या सोनेरी उन्हाला आणि अश्र्विनातल्या पिवळ्या धमक उन्हाला जोडणारा एक सुंदर दुवा! फुलं-पत्रीनी सजणारे गौरी गणपती आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जातात.ऋषींची भाजी, उकडीचे मोदक, घावनघाटल अशा आजी-आईनी शिकवलेल्या पदार्थांमुळे सजणारी ताटं त्या त्या ऋतूत काय खावं ह्याचे धडे देतात. 

      ह्याच महिन्यात येणारा पितृपक्ष जो आपल्या पुर्वजां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा पंधरवडा असतो. आणि त्यामुळेच ह्या दिवसात शुभकार्य करू नये ही अंधश्रद्धा अजिबात बाळगु नये.कारण त्या पुर्वजांनी केलेले संस्कार, परंपरांचे स्मरण करून देणारा तर हा भाद्रपद महिना आहे.आणि तो सण, उत्सवांना घेऊन  येतोच मुळी निसर्गाच्या हिरव्यागार पायघड्यांवरून! 

      निसर्ग तोच आहे पण आपण मात्र पर्यावरणाची काळजी न घेतल्याने सध्या ऋतुचक्र वेडंवाकडं फिरताना दिसतंय. जिकडे तिकडे उभ्या केलेल्या सिमेंटच्या जंगलांनी आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर केलेल्या वृक्षतोडीमुळे डोंगरांवरच्या दरडींच स्खलन होतंय, पूरस्थिती निर्माण होतेय आणि ह्यासाठी आपल्या प्रत्येकाला ह्या भाद्रपदात येणाऱ्या सार्वजनिक सणांच्या निमित्ताने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वत:ला शिस्त लावून घेतली पाहिजे.वृक्षवेलींशी दुरावलेल्या आपल्या नात्याला पुन्हा एकदा जपल पाहिजे.त्यानंतरच आपल्याला पावसाच्या नंतर भाद्रपदात दिसणाऱ्या इंद्रधनुष्याचे स्वागत करता येईल.

                                                                            -ललिता छेडा.

पाऊलखुणा



नवीन ब्लाॅग लिहायचे तर ललित लेखच लिहावेत असं मनात आलं. कथा लिहीताना खूप कल्पना विलास असतो. संवाद असतात. पण ललित लेखनात मात्र विषयाचा धागा पकडून त्याला भाषेचं सौंदर्य, स्वत:चे अनुभव, विचार ह्या सगळ्यानी वाचनीय करण्याची जबाबदारी असते.

एक मात्र वेगळं आहे की कथेच्या माध्यमातून कल्पनेतल्या माणसांना रंगवलं आता आयुष्याच्या वाटेवर भेटलेल्या माणसांना, अनुभवांना लेखनातून पुन्हा एकदा अधिक समजून घ्यायचा प्रयत्न करायचाय. कदाचित माणसं नव्यानं कळतील!

ह्यासाठी मराठी महिने आणि त्यानिमित्ताने येणारे सणवार हा एका लेखाचा विषय असेल आणि दुसरा लेख त्या महिन्यातल्या खास दिवसांविषयी असेल. ह्या सगळ्या पाऊलखुणा आहेत. ज्यांच्याकडे मागे वळून पहायचंय आणि पूढे जाताना चांगल्या उमटतील असंही पहायचंय!

अर्थात ह्यासर्वासाठी वाचकांच्या प्रतिक्रिया, शुभेच्छांची आवश्यकता आहेच.

- ललिता छेडा.


Thursday, May 23, 2019

कवडसा

                      

              डॉ.नील  लांज्या जवळच्या गावात आजीच्या घरी पोचले तेव्हा सकाळचे साडेआठ वाजले होते.रात्रभर ड्रायव्हिंग करून ते खूप दमले होते.तरी दोन वेळा धाब्यावर जेवले तेव्हा आणि पहाटे चहा प्यायल्यावर त्यांनी तासभर गाडीतच झोप काढली होती. त्यांना देवळाजवळ गाडी लावताना बघून बयो धावतच बाहेर आली.
      "अरे, नील दादा तुम्ही कसे अचानक? तुम्ही तर जून महिन्यात येणार होतात ना? बयो प्रश्र्न विचारत त्यांचं सामान काढत होती.तिच्या लेकीने डॉक्टरांना तांब्यात पाणी आणून दिलं.पाणी इतकं गार होतं की त्यांच्या शरीरातून एक शिरशिरी येऊन गेली.फ्रीजशिवाय इतका गारवा! त्यांना तसं विचारात बघून बयो हसली"आता  उतारावर पायर्‍या आहेत. काळजी नका करू. नीलला आठवलं त्या उतारावर तो किती वेळा पडला असेल त्याची खिजगणतीच नाही.पण गेल्या वर्षी नंदीनी त्याची बहीण येऊन गेली तिनं सांगितलं होतं की आजीनं उतारावर छान पायर्‍या करून घेतल्या आहेत.
     तो आल्याची वर्दी बयोच्या मुलानं आजीला दिलीच होती.त्यामुळे खाली घरापुढच्या गोठ्याबाहेर येऊन ती डोळ्यांवर तिरपा हात ठेवून वर बघत होती. त्यानं पण हात हलवून आजीला आपण आल्याचं सांगितलं.आणि येतोय अशी खूण केली.
      बयो सामान घेऊन खाली पोचली होती.बाहेरूनच त्यानं  गणपतीला नमस्कार केला.आणि इकडे तिकडे बघत तो पायऱ्या उतरू लागला.आजूबाजूचा निसर्ग बघून सगळा थकवा दूर झाल्यासारखा वाटत होता.गोठ्याजवळ आजी उभी होती. "इंदर,राजा कधी निघालास? रात्रभर गाडी चालवत होतास? आणि एकटाच आलास? आजीचे प्रश्र संपत नव्हते. आणि सगळ्या जगासाठी तो नील होता पण आजी मात्र इंन्द्रनील मधला इंद्र म्हणायची आणि ते इतकं गोड उच्चारायची कि नीलला ते फार आवडायचं. नील पूढे येवून तिच्या पाया पडला.आणि म्हणाला "अग हो हो, मला घरात तर येऊ दे!...
       घराच्या पायऱ्यांजवळच्या डोलग्यात पाणी भरलेलं होतं.नीलनी नेहमीप्रमाणे त्यातून पायावर पाणी घेतलं. आणि पायर्‍या चढून वर आला तर बयो भाकरतुकडा घेऊन उभी होती.आणि तिच्या बरोबर मागे आजोबांचा मोठा फोटो होता.आणि नीलला बयोमध्ये आजोबांचा एकदम खूप भास झाला.आणि त्याला तो आणि नंदिनी सारखी बयोपण डावखूरी आहे हेही जाणवलं. आजोबा डावखूरे असल्याने आपण दोन्ही नातवंडे डावरे आहोत. हे ठीक आहे. पण ही कशी? घरात शिरताना आपण हे काय विचार करतोय? नीलनी सगळं मनातून झटकलं. 
     आजी समोर बसल्यावर त्यांना जाणवलं आपल्याला जाम भूक लागलीय.आणि आजींनी आपला आवडता गुरगुट्या भात केलाय.किती वर्षांनी आपण आजीच्या हातचा असा भात खाणार आहोत.
       खाऊन नीलनी ताणून दिली आणि त्यांना जाग आली तेव्हा चार वाजले होते.
      बाहेर आले तर आजी आणि बयो झाडांपाशी काही तरी करत होत्या. त्याला बघून आजीनं हातानेच 'ये खाली' अशी खूण केली. आजोबांच्या त्या घराची रचना उतारावर होती.सर्वात वरती पिढ्यानपिढ्यांच गणपतीचं देऊळ,त्यानंतर उतरल्यावर घर आणि गोठा, आणि खाली उतरलं की हौद आणि आजीची फळं,भाज्यांची बाग! आणि देवळासमोरच्या रस्त्यापलिकडे दीड एकरवर  आंब्याची कलमे आणि भाताची शेती. जे सगळं बयोचा नवरा बघत होता.
      नील  तोंडावर पाणी फिरवून आजीच्या दिशेने खाली उतरून गेला त्याला बघून आजी म्हणाली" झाली का झोप डॉक्टरसाहेब,हाॅस्पिटल बायकोवर टाकून आलात का? आजी बोलल्यावर नीलला रेवतीची त्याच्या बायकोची आठवण झाली, कालपासून आपण रागारागाने निघालो आणि फोनसुध्दा केला नाहीय.आई काळजी करत असेल." विचार नको करू, मी फोन करून तुझ्या आईला कळवलय तू पोचल्याचे! आजीनं नीलचा प्रश्र्न सोडवला होता. नाहीतरी आजीचं तिच्या सुनेशी म्हणजेच त्याच्या आईशी खूप गुळपीट होतं.
         नीलला अचानक जाणवलं की आईनं तर आजीला सगळं सांगितलंच असणार. पण त्यानं ठरवलं की आपणहून काहीच बोलायचं नाही.
       नील मांडी घालून हौदाच्या कट्ट्यावर बसला. पंप सुरू होता त्यामुळे पाणी हौदात पडत होते आणि त्याचे तुषार अंगावर उडत होते. "आजी अग, जून महिन्यात यायचंच होतं, मी विचार केला  थोडं आधी जाऊन तुझ्याशी बोलून घ्यावं आणि पेपर तयार करून घ्यावेत म्हणजे रेवती येईल तेव्हा वेळ जाणार नाही.आणि मला पण चेंज हवाच‌ होता. आजी सुचक हसली. जणू काही म्हणत होती " तू लपव पण मला सगळं कळलाय!
     वरून चहा घेऊन बयो आली आणि पुन्हा एकदा नीलला आजोबांची आठवण झाली. तिनं चहाचा कप नीलच्या हातात ठेवला आणि म्हणाली" रात्री जेवायला काय करू? "काहीही चालेल, मी थोडा गावांत फेरी मारून येतो" नील चहाचा कप ठेवून हौदावरुन उतरत म्हणाला.
      आधी वरती देवळात जायचं त्यानं ठरवलंच होतं. देवळात बयोची मुलगी गाभाऱ्यात काही तरी करत  होती.तिला बघून नीलच्या मनांत आलं की ही बयो आपल्यापेक्षा जवळजवळ वर्षभरानी लहान पण हिची मुलं किती मोठी आणि आपला पार्थ तर अवघा आठ वर्षांचा आहे.
     पार्थची आठवण झाली आणि तो हरवल्यासारखा देवळातल्या मंडपात बसला.
      त्याला रेवतीशी आपलं झालेलं भांडण आठवून वाटलं किती छोट्या गोष्टी वरुन आपण आरडाओरडा केला. 
       त्यादिवशी सकाळी हाॅस्पिटलमध्ये कोणत्यातरी पेशंटला भेटायला आलेला श्रीराम त्यांच्या केबिनमध्ये आला आणि  रेवतीला बघून अगदी सहजपणे म्हणाला" कशी आहेस रेवती? किती वर्षांनी भेटतेयस! मग रेवतीनी ओळख करून दिली"हा श्रीराम, आमचा जुना शेजारी, आमच्या दोन्ही घरांत खूप जिव्हाळ्याचं नातं होतं."इतकं की आमच्या दोघांचं लग्न जवळजवळ ठरलेलंच होतं."श्रीराम हसतहसत म्हणाला.
    "मग कुठे माशी शिंकली? आपण थोडं कुत्सित स्वरात विचारलं.आणि रेवतीनं चमकून आपल्याकडे बघितलं."अरे डॉक्टरसाहेब,तुम्ही सिरीयसली घेतलं! झालं असं की  मीच एका मुलीच्या प्रेमात पडलो आणि रेवती तुमची झाली."श्रीरामच्या बोलण्यातला उपरोध नीलला प्रचंड संताप देऊन गेला.रेवतीनी श्रीरामकडे फारसं लक्ष न देता त्याच्यासाठी काॅफी मागवली आणि त्याच्याशी संबंधित पेशंट बद्दल बोलणं सूरू केल.काॅफी आणि बोलणं संपल्यावर "चल श्री,आम्ही दोघेही जरा बिझी आहोत तेव्हा नंतर भेटूया"असं बोलून रेवतीनं त्याला अक्षरशः केबिन बाहेर काढलं.नंतर दुपारच्या जेवणापर्यंत आपण उगीचच चिडचिड करत होतो.आठवून नीलला हसू आलं. देवळात तो एकटाच बसला होता. ती शांतता, समोरची सुंदर मुर्ती त्याला खूप रिलॅक्स वाटलं. त्याला आठवलं, आपण घरी आल्यावर किती भांडलो रेवतीशी की तिनं लग्नाआधी, लग्नानंतर कधीच श्रीरामविषयी का नाही सांगितलं. तिचं त्याच्यावर प्रेम होतं का?जर होतं तर तिनं माझ्याशी प्रेमविवाह कसा केला.असं काहीही आपण बडबडलो. आणि हे सगळं आपण वेड्यासारख आईसमोर बोललो. नीलला रेवतीची खूप आठवण आली. ती सारखी म्हणत राह्यली "अरे, इतकं काही सिरीयसली आमच्या घरातून बोललं जात नव्हत. मी तर कधी त्याच्या बद्दल असा काही विचारदेखील केला नव्हता.नीलला वाटलं आपण येवढा आरडाओरडा का केला? आपण हल्ली रेवतीच्या होणार्‍या कौतुकामुळे जरा जेलस होतोय का? का पेशंट पण रेवतीच हवी असा आग्रह धरतात म्हणून आपली चिडचिड होतेय, विचारांनी नील एकदम दचकला. 
       आपण दोघंही गायनॅक, रेवतीनी दोन्ही घरातल्या मंडळींना समजावून लग्न थाटामाटात न करता कोर्ट मॅरेज करून खर्च वाचवला आणि त्या पैशातून आपण हाॅस्पिटल काढलं. 
      रेवती आहेच तशी विचारांनी स्पष्ट, गोड बोलून माणसांना जोडणारी!! नीलला वाटलं फोन करून तिची माफी मागावी. पण पुन्हा त्याच्या मनात आलं की तिनं इतकं महत्त्वाचं माझ्या पासून लपवलं आणि मी कशाला माफी मागू..... डोळे बंद करून बसलेल्या नीलला कसलीतरी चाहूल लागली. त्यानं डोळे उघडले तर समोर आजी उभी होती. "अरे,तू वर चढून आलीस! 
नील उठून उभा राहिला.
      "इंदर, अरे तू गावात जाणार होतास ना? पण मला बयो म्हणाली तू इथेच बसलायस! चल आता मी वरती चढून आलेच आहे तर गांवात जावून भागवत वकीलाला उद्या संध्याकाळी बोलवून येऊ" आजी ठरवूनच आली होती.
"चल जाऊया, भागवत म्हणजे विनायक ना? नीलनी विचारलं.
     अरे व्वा, आठवतोय का विनायक? लहान असताना तू आणि विनायक किती खेळायचात! तो वकील झाला पण त्यानं गावातच वकीली करायचं ठरवलं! शिवाय त्यांची शेती पण आहे ना! एकुलता एक असल्याने सगळं त्यालाच बघावं लागतं.बोलताबोलता विनायकच घर आलं होतं.
विनायक पडवीतल्या झोपाळ्यावर बसलेला होता,त्या दोघांना बघून विनायक उठून दाराशी आला"अरे, डॉक्टरसाहेब तुम्ही जून मध्ये येणार असं आजी म्हणाली होती.लवकर आलात? विनायकनी नीलशी हात मिळवून हसत हसत विचारलं.
    "हे बघ आधी अहोजाहो करू नकोस. आणि किती वजन वाढवलयस! नील पण मोकळेपणाने बोलत होता.
     त्या दोघांना तसं बोलताना बघून आजी आत गेली.
     " आजी,ग्रेट आहे ना! चौर्‍याएंशी वर्षाला पण किती अॅक्टीव आहे नाही.विनायक पाठमोऱ्या आजीकडे बघून म्हणाला.
       कामाचं ठरवायला उद्या संध्याकाळी विनायकनी आजीच्या घरी यायचं ठरलं. तेवढ्यात नीलला रेवतीचा फोन आला.तिनी दोन दिवसाचं सर्व पेशंटस् चे अपडेट दिले.तिचं तसं औपचारिक बोलणं नीलला जाणवत होतं.पण त्यानंही तिला तशीच उत्तरं दिली. 
       रात्रीची जेवणं झाली आणि नील बाहेर अंगणात आला.पाठोपाठ आजी पण आली.
        "आजी,ही बयो इतकी कशी आजोबांसारखी दिसते" न राहवून नीलने आजीला विचारलं.
       आजीनं मोठा सुस्कारा सोडला आणि म्हटलं"तू  डाॅक्टर आहेस ना?मग समजलं नाही ती तुझ्या आजोबांचीच मुलगी आहे.
       "अग पण ती माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. असं कसं होईल?नीलला कळत होतं पण मनाला पटत नव्हतं.
      "हे सर्वांना माहीत असलेलं गुपित आहे. फक्त तू पहिलाच आहेस ज्यानं मला विचारलं.आजी थोडी अस्वस्थ झालेली जाणवली. "जाऊ दे आजी, तुला त्रास होत असेल तर नको बोलूया हा विषय! नीलला वाटलं आपण किती घाई करतो बोलायची!
       नाही आता ऐक, तुझ्या वेळेस तुझ्या आईचं बाळंतपण करायला मी मुंबईला राह्यले होते. तेव्हा बयोचे आई-वडील शेती, देऊळ सर्व बघायचे.त्यांना मुलबाळ नव्हतं. ती दोघं इथेच देवळातल्या खोलीत रहायचे. मी तीन महिने त्यांच्याच जीवावर पहिल्यांदा हे घर सोडून इतके दिवस मुंबईला राह्यले होते.
      "पूढे काही बोलू नकोस! नील आजीकडे न बघता म्हणाला.
     "ऐक रे राजा, पहिल्यांदाच मी हा विषय कोणाशी तरी बोलतेय".आजीचे शब्द रात्रीच्या शांततेला चिरत जात होते." मी अनाथ होते, मामांकडे लहानाची मोठी झाले सोळाव्या वर्षी माझं लग्न तुझ्या आजोबांशी झालं. आजोबांनी मला खरंच खूप प्रेम दिलं. त्यामुळे बयोच्या जन्माआधी तिच्या आईनं आणि तुझ्या आजोबांनी त्यांची चुक कबूल केली.माझ्यावर तर आभाळ कोसळलं होतं.पण कुठे जायचं हे घर सोडून काहीच कळत नव्हतं. बयोच्या जन्मानंतर दोन दिवसांत तिची आई गेली.आणि मी पुढे होऊन बयोची जबाबदारी घेतली.तिला लहानाचं मोठं केलं, लग्न करून दिलं, दहा वर्षापूर्वी तुझे आजोबा गेले. बयोच्या दिसण्यामुळे सर्वांना कळतं पण मला कोणी काही विचारत नाही.
       "इंदर बेटा आपल्याला दुखवणार्‍याला माफ करणं खूप कठीण असतं त्यापेक्षा जास्त कठीण असतं आपलं  दुःख आपण विसरलोय असं लोकांना दाखवणं. 
     आजी कमरेवर हात ठेवून उठली आणि घराकडे जड पावलांनी जाऊ लागली.नीलला रेवती ची खूप आठवण झाली त्यानं घड्याळ बघितलं एक वाजून गेला होता.
      सकाळी  उठल्यावर नील बाहेर आला.अंगणातल्या डोलग्यातल्या पाण्यावर कवडसा पडला होता. आणि नीलला आठवलं'आपण पाण्यात हात घातला की तळ वरती आलेला दिसायचा आणि हात मात्र खूप आत बुडून जायचा. त्याच्या मनात आलं'असाच कवडसा आपल्या मनावर पडलाय ज्यानं आपल्या  खोल असलेल्या मनाचा तळ उंचावलाय! सहन करणारे,त्याग करणारे  विचारांनी किती खोल असतात.
       त्यानं रेवतीला फोन लावला" साॅरी, रेवती मी खूप चुकीचं वागलो. रेवतीला काय ‌बोलावं कळत नव्हतं, तिच्या डोळ्यातलं पाणी बघून नीलच्या आईनं ‌ तिच्या हातातून फोन घेवून"या आता घरी आणि बोला काय बोलायचं ते, दोन दिवस पोर येवढस तोंड करून आहे.आधी इथे येऊन तिची समजूत काढ आणि मग पुढच्या आठवड्यात सगळेच जाऊया आजीकडे! असं म्हटलं. नीलला कळलं तिथे काय घडलं असेल ते!!!
     संध्याकाळी विनायक आला आणि नीलनं बोलायला सुरुवात केली " आजीला हे सगळं माझ्या नावांवर करायचंय आणि त्यासाठी ती गेली चार पाच वर्षे मागे लागली होती. त्याबद्दल मी माझं मत आजी समोर सांगू इच्छितो.
       नीलनी बयोला पण बोलावून तिथे थांबायला सांगितलं.
      देवळाचं आपण ट्रस्ट करूया. त्यात मी,नंदीनी दोन्ही आत्यांची मुलं असतील.
      हे घर आणि परिसर रेवतीच्या नावांवर करावं असं मी सुचवतो.
        आणि महत्वाचं म्हणजे रस्त्यापलिकडची दीड एकर जमीन बयोच्या नावांवर करायची.कारण इथलं सगळं आणि आजीला तिच सांभाळणार आहे. नील बोलायचा थांबला आणि आजीनं त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला.जणू ती त्याच्याशी सहमत असल्याचं सुचवत होती. 
          तिला कळलं होतं की आपल्या नातवाच्या मनात पडलेल्या कवडशांनी त्याच्या मनाचा तळ उंचावलाय.
  विनायक उठून उभा राहिला आणि नील जवळ येऊन म्हणाला"मित्रा, खूप छान वाटणी केलीस. मी तुझ्या मनाप्रमाणे सर्व कागदपत्रं तयार करून ठेवतो. फक्त एक इच्छा आहे, इतका मोठा डाॅक्टर आहेस त्याचा ह्या गावाला उपयोग होईल असं काही तरी कर."
      नील उठून आजीच्या पाया पडला आणि म्हणाला"आजी, उद्या जातोय,सगळ्यांना घेऊन जुनच्या पहिल्या आठवड्यात येईन.विनायक तुझी सुचना मी नक्की लक्षात ठेवेन. हे सगळं ऐकत असलेल्या बयोला अश्रू आवरत नव्हते.तिच्याजवळ येऊन नीलनी "ऐ,वेडाबाई रडतेस काय तू पण आता  आमच्या घरातलीच आहेस, चल सर्वांसाठी चहा कर. असं म्हटलं.
     घरात जाताना नीलनं डोलग्यात हात घालून ते पाणी स्वत:वर उडवलं. कवडसा आपलं काम करून नाहीसा  झाला होता.
                                                                             -ल़लिता छेडा



                             गेलं वर्षभर 'एकटेपणाशी मैत्री' ह्या विषयावर दर गुरुवारी संध्याकाळी मी छोट्या कथा ह्या ब्लाॅगवर लिहिल्या. त्यातली ही शेवटची बावन्नावी कथा. ह्या कथांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार!! 
                                                        

Thursday, May 16, 2019

जाणीव

अंधेरीच्या आमच्या फ्लॅटच्या समोरचे दोन वन बेडरूमचे फ्लॅट बिल्डरने दोन्ही टाॅवरची कामं पूर्ण होईपर्यंत स्वत:साठी ठेवले होते. पहिल्या मजल्यावरच्या ह्या दोन्ही फ्लॅटच्या किल्ल्या कायम आमच्याकडेच असायच्या.कारण आमच्या ह्यांचा समाजसेवी स्वभाव! सोसायटी रजिस्टर होईपर्यंत बिल्डरला मदत करायचं ह्यांनी मनावरच घेतलं होतं."अग, रिटायर्ड झाल्यावर मला किती आवडतं काम मिळालंय ते बघ! ह्यांच उत्तर ठरलेलं होतं.आणि ते खरं पण होतं.
      आम्हा एकंदर आठ बिर्‍हाडांना जागा दिल्यावर बिल्डर दोन टाॅवरच बांधकाम सहज करू शकत होता.आणि तसं त्यांनं ते केलं.आम्हाला प्रत्येकाला टू बेडरूमचे ब्लाॅक दिले होते.आमच्या मजल्यावर आम्ही जुने तीन भाडेकरू वैद्यमामी, सावंत काका, आम्ही आणि बिल्डरचे दोन ब्लाॅक जिथं त्यांचं आॅफिस होतं.त्यामुळे आमच्या मजल्यावर सतत वर्दळ असायची. आणि आम्ही सगळे जुने शेजारीअसल्यामुळे दरवाजे उघडेच असायचे.
      आणि मग वर्षंभरात दोन्ही टाॅवरची सोसायटी रजिस्टर झाली आणि आमचे हे त्या‌ सोसायटीचे सेक्रेटरी झाले. आणि नोकरी पेक्षा जास्त बिझी झाले. शेजारच ऑफिस पण बंद झालं.आणि आमचे बिल्डर प्रतापभाईंनी त्या ब्लाॅकची स्वच्छता, रंगरंगोटी करून किल्ल्या  आमच्याकडे ठेवल्या. कारण आता तो विक्रीसाठी तयार झाला होता.
       पंधरा-वीस दिवसात हे म्हणाले" ऐकलंस का?समोरचे दोन्ही ब्लाॅक विकले गेले. मी पण लगेच विचारलं"अरे व्वा,न बघता दोन्ही फ्लॅट विकत घेणारे कोण आहेत हे टिकोजीराव? 
    हे पण हसत हसत म्हणाले" खरंच टिकोजीराव आहेत! इथे आॅफीस होतं तेव्हा बघून गेले होते म्हणे, आता बुकिंग करताहेत.एक ब्लाॅक मेघना साने आणि दुसरा अखिलेश शर्मा! आहे की नाही गंमत आणि दोघंही एकमेकांचे जवळचे मित्र आहेत."तुम्हाला बरं इतके डिटेल्स कळले. अग, मी जरा कामासाठी  प्रतापभाईंच्या आॅफिसमध्ये गेलो होतो तेव्हा नेमके दोघं तिथं आले होते. उद्या सकाळी येणार आहेत. शर्मा घर बघायला" ह्यांच्या शेवटच्या वाक्याला वैद्यमामी आल्या आणि"अगोबाई, कोणी शर्मा येणार आहे का शेजारी?" कपाळावर हात लावून उद्गारल्या. मग पुन्हा एकदा ह्यांनी त्यांना सगळी गोष्ट  सांगितली.सगळं ऐकल्यावर मामी"काय तरी बाई हल्लीच्या पिढीची तर्‍हा !  पण उद्या ती मंडळी आल्यावर मला बोलवा बरं! असं मला सांगायला विसरल्या नाहीत.
      दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास जीन्स,टी शर्ट घातलेल्या दोघंजणानी आमच्या दाराची बेल वाजवली." समोरच्या ब्लाॅकची किल्ली हवी होती! बोलक्या डोळ्याची, गोरीपान, थोडीशी बुटकी पण स्मार्ट मुलगी दारात उभी राहिली होती.तिच्या हातात किल्ल्या ठेवताना मी सहज म्हटलं"आत या, पाणी प्या.मग उघडा दार. त्याबरोबरच त्याला शोभणारा चष्मा लावलेला, गोरापान असलेला तो मुलगा सरळ आतच शिरला."मेघना,तुम जाओ सब अच्छे-से नक्की करलो, मैं यहां काकीजी के घर पे बैठा हूं। ती अर्थात मेघना चिडून म्हणाली" अरे,  अखिलेश,तुझ्या घराचं पण ठरवायचंय ना! त्या इंटिरियरला नंतर वेळ नाहीये."आता हूं बाबा, तुम्हारे रूमसे शुरू करो। तबतक मैं चाय पीके आता हूं। अखिलेश सोफ्यावर येऊन ह्यांच्या शेजारी बसला होता.मला त्याचा मोकळेपणा आवडला होता. त्या दोघांची चाहूल लागताच वैद्यमामी आल्याच होत्या. अखिलेश ह्यांच्या शेजारी छान मांडी घालून बसला होता. "काकी,आपके दो बेटे है ना? गप्पा सुरूच झालेल्या होत्या." हो रे बाबा, एक बंगलोरला रहातो, शादीशुदा है. आणि दुसरा शिकतोय,पुण्याला असतो. त्यामुळे आम्ही इथं एकटेच! मी पण मोकळेपणाने सांगितलं आणि चहा टाकायला आत जाऊ लागले तर म्हणतो कसा "क्यूं मैं आ गया हू ना!"पूढे लगेच"काकी,मुझे बडे मगमें चाय देना,मुझे वो बशी नहीं चाहिए। असं म्हणून हा मोकळा. वैद्यमामी माझ्या बरोबर स्वैपाकघरांतच होत्या." काय बाई हा मुलगा, ओळख ना पाळख. कसा वागतोय घरातल्यासारखा!"वैद्यवहिनी,असतात काही माणसं अशी मनमोकळी, हे बघा आता तुम्ही हा चहा घेऊन बाहेर जा आणि मी त्या मेघनाला चहा देऊन येते.मी दोन कप घेऊन तिथून निघालेच. वहिनींना तेच हवं होतं.
      परत येईपर्यंत मामी आणि अखिलेश भाच्याची गट्टी जमली होती.
        मला बघितल्यावर "अबसे ये हमारी भी मामी बन गयी है" अखिलेश चहाचा कप ठेवत म्हणाला.
     "अरे, तुम्ही शर्मा म्हणजे... वैद्यमामी मुद्यावर आलेल्या होत्या.
    "मामी, हम लोग मारवाड़ी है" अखिलेशच्या बोलण्यानं मामींनी श्र्वास सोडला आणि म्हटलं"म्हणजे"
      "हां,हम लोग पक्के शाकाहारी! अखिलेश एक परीक्षा पास झाला होता. वैसे मामी,शर्मा तो पंजाबी,यु. पी. में भी होते हैं। 
     तुम्ही कुठचे?मामी सुरू झाल्या होत्या.
      "आम्ही,बनारसचे  तिथे माझ्या बाबुजींच मोठं मिठाईचं दुकान आहे.मेरे औरभी दोन भाई है एक सबसे बडी बहन है। मुझे फिल्म लाइन में जाना था तो मैंने दिल्लीकी फिल्म इंन्स्टीट्युडकी पदवी लेकर बम्बई नसीब आजमाने आया हूं। मैं फिल्म एडिटिंग करता हूं, आणि मेघना कुठे भेटली तुला?मामींना सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच हवी होती. पण तेवढ्यात मेघना रिकामे कप घेऊन आली आणि ते टेबलावर ठेवून 'thanks'  म्हणून अखिलेशकडे बघून 'चलो' म्हणून बाहेरचं पडली.अखिलेश तिच्या जाण्याकडे डोळे मिचकावत आम्हा सगळ्यांना "बाय"म्हणून तिच्या मागे पळायची अॅक्शन करत गेला. 
     त्यानंतरच्या अवघ्या दोन महिन्यात खूप धावपळ करून मेघनानी दोन्ही ब्लाॅक सुंदर सजवले. स्वैपाकघर एकच होतं.अखिलेशच्या हाॅलमध्ये खिडकीजवळ छोटा ओटा केला होता आणि खिडकीतच छानशी दोन कपाटं केली होती.ज्यात गरजेपुरती स्वैपाकाची भांडी,सामान ठेवलं होतं.अखिलेश चहा, खिचडी करू शकत होता. मधली भिंत तोडून काचेची खिडकी केली होती. त्यामुळे लग्नानंतर ती खिडकी उघडली की मोठा फ्लॅट तयार!
       रोज सकाळचा नाश्ता आणि रात्रीच जेवण ती दोघं एकत्र घेत असत. मेघनाच बनवत असे. त्या दोघांचं लग्न ठरलेलंच होत.मेघना एम्.एसी करून मोठ्या काॅलेजमध्ये नुकतीच नोकरीला लागली होती.पण सध्या लग्न न करण्याचा निर्णय मेघनाचाच होता.
    अखिलेशशी गप्पा मारताना कळलं होतं की मेघनाचे वडील रेल्वेत नोकरीला होते.त्यांची बनारसला बदली झाली आणि अखिलेशच्या बाबूजींच्या वाड्यात ओळखीने त्यांना जागा मिळाली.तेव्हाच अखिलेशचा जन्म झाला होता.त्यानंतर त्या दोघांची इतकी घट्ट मैत्री झाली की मेघनाच्या बाबांच्या सर्व नातेवाईकांनी बाबूजींच्या वाड्यावर राहून काशीयात्रा केली.आणि बाबूजींच्या कितीतरी नातेवाईकांनी मेघनाच्या घरी राहून मुंबई बघितली. दोन्ही घरांत एक आपुलकीचं नातं निर्माण झालं होतं.आणि त्यात अखिलेशनी मेघनाशी लग्न करायची इच्छा प्रगट केली आणि दोन्ही घरांनी आनंदाने परवानगी दिली होती.
       अचानक मेघनाच्या बाबांचं हार्ट अॅटॅकनी दु:खद निधन झालं.आणि एकुलत्या एक मेघनावर आईची जबाबदारी आली.  मेघनाच्या आईचं रहात घर पागडीच होतं.त्यामुळे स्वत:च घरं घेऊन आईला तिथं आणायचं हे तिचं ठरलेलंच होतं.
    एक दिवस अचानक वैद्यमामींनी अखिलेशला विचारलं" तुमची प्रेमाची गाडी अडलेय कुठे?तुझे आईवडिल येऊन गेले किती छान मंडळी आहेत ती,मेघनावर तर किती प्रेम करतात.आता तर डोंबिवलीचं घर बंद करून मेघनाच्या आई पण इथं पावसाळ्यानंतर रहायला येतील.पण तुमचं ठरत का नाहीये?
      "सच बोलू मामी, उसका कहना है कि उसको मेरे प्यारका 'एहसास' नहीं हो रहा है उसे मुझसे प्यार है कि नहीं मालूम नहीं हो रहा है। 
     उसके पिताजी के अचानक जाने से वो confused है।अखिलेश खरं मनातलं बोलला होता.
  ‌   अरे हा 'एहसास' असतो तरी काय? मामींचा भाबडा प्रश्न!
       'जाणीव' मी थोडंसं विचार करून दिलेलं उत्तर.
        अजून कसला एहसास हवाय तिला?तुला तर आता कामं पण मिळायला लागली आहेत.?मामींना अजूनही एहसास कळला नव्हता.विषय तिथेच अर्धवट राह्यला.
     पण मामींनी मात्र अर्थ विचारून शोध लावला असावा.
        थोड्याच दिवसात मामींच्या कोकणात रहाणाऱ्या भावाची मुलगी वीणा,  मामींकडे रहायला आली. मुलबाळ नसल्याने मामा मामी वीणाच्या येण्यानं खूप खूष झाले होते. मामीच्या स्वैपाक करण्याला एक चांगलं कारण मिळालं.कोकणातच लहानाची मोठी झालेली वीणा थोडी शहरांत रूळावी.म्हणून आणि तिच्या लग्नाचं मामींनी बघावं ह्या इच्छेनं तिला इथं मामींच्या भावानं पाठवलं होतं.आल्याआल्या तिची अखिलेशशी छान गट्टी जमली आणि सावंतकाकांच्या सुनेनंपण तिच्याशी मैत्री केली.त्यामुळे आमचा मजला धमाल मस्तीची एक जागा झाली.सगळ्यांच्या सल्ल्याप्रमाणे तिनं अखिलेश ज्या कम्प्युटर क्लासमध्ये वेळ जावा आणि पैसा मिळावा ह्यासाठी शिकवत होता.तिथेच वीणाने आणि सावंत काकांच्या सुनेने देखील कम्पुटर शिकायला अॅडमिशन घेतली होती.रोज तिघं सकाळी बहूतेक एकत्रच निघत असत.संध्याकाळी आमच्या घरी पत्ते,कॅरम,गाणी अशी धमाल चालायची.अनेकदा तिन्ही घरातले आम्ही एकत्रच जेवायचो.
      ह्यात मेघना खास इंन्व्हाॅल्व्ह नसायची.अखिलेश मात्र दोन्ही  बिल्डींगचा हीरो होता.
     त्यादिवशी मेघना कामावर जाताना काही तरी विसरली आणि तिनं अखिलेश, वीणाला अखिलेशच्या बाईक वरून जाताना बघितलं.आणि पहिल्यांदाच आपणहून माझ्या घरी येऊन विचारल " ती शेजारची पण जाते ना वीणा बरोबर शिकायला?
    "अग,सावंतांकडे आज सकाळी जेवायला पाहूणे येणार आहेत त्यामुळे ती नाही गेली.का ग?"मी विचारलं पण ती गुळमुळीत 'सहजच' असं म्हणून गेली.
     त्यादिवशी संध्याकाळी कॅरम खेळताना अचानक मेघना आली आणि अखिलेशच्या जवळ जाऊन बसली.तो पण थोडा गडबडला पण खूष ही झाला होता."वीणा कुठे दिसत नाही?" मेघनानी इकडे तिकडे बघत मला विचारलं. लगेच अखिलेश म्हणाला"अरे, वो तो कुछ अपने गांव की स्पेशल डिश बना रही है। आज उसकी तरफ से ट्रीट है। वो क्लासमें फर्स्ट आयी है ना।
       मेघनानी काही तरी विचार केला आणि म्हणाली" तोपर्यंत मी काॅफी करून आणते.....ती आत गेल्यावर मामी लगेच म्हणाल्या"क्या रे बाबा,  लगता है,तुझा तो एहसास की फैसास होतोय की काय? 
      अखिलेश थोडासा आश्र्चर्यचकीत होऊन म्हणाला "बदलाव तो है, लेकीन आपको कैसे पता चला?
       मामी आणि मी दोघी एकमेकींकडे बघून फक्त हसलो."एकटं पडलं आणि असुरक्षित वाटलं की असंच काहीसं होतं."मामी हळूच म्हणाल्या.
     काॅफी आणल्यावर मेघना अखिलेशकडे बघून म्हणाली " मी शुक्रवारी आईला चार दिवसांसाठी इथे आणते.आपल्या घरी आपल्या ह्या गृपला रविवारी दुपारी जेवायला बोलवू या.
      त्यादिवशी वीणाने केलेले कोळाचे पोहे सर्वांनाच खूप आवडले.वीणाचं खूप कौतुक झालं. मेघना पण सगळ्यांच्यात मिसळून अखिलेशच्या जोडीनं वावरत होती.
        रविवारची मेघनाची पार्टीपण खूप छान झाली. मेघनाच्या आईला मेघनाचं हे बदलेले रूप आवडलं होतं. त्यामुळे त्यांनी पण मनापासून स्वैपाक केला होता. 
      जेवणं झाल्यावर सावंत काका अगदी सहजपणे म्हणाले" मामी, तुमच्या वीणाचा, आता लग्नाचा काय विचार? अखिलेश.... त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत मेघना अखिलेशच्या जवळ उभी राहून त्याच्या दंडाला धरून म्हणाली"अखिलच तर माझ्याशी लग्न ठरलय ना, तिनं हे सगळं इतकं अचानक आणि तिच्याही न कळत केलं की अखिलेशसह सर्वचजण स्तब्ध होऊन गेले.
      शांतता भंग करून सावंत काका म्हणाले" अग मेघना ते तर जगजाहीर आहे. तुझ्या आईसकट आम्ही फक्त तुम्ही कधी जाहीर करताय त्याची वाट पहातोय! मेघनाला आपण केलेली घाई कळली होती.ती लाजली आणि त्याबरोबर अखिलेशनी चक्क सर्वांसमोर तिला मिठीच मारली.
       "जाणीव नव्हे नव्हे 'एहसास' झाला बरं एकदाचा! मामींनी अखिलेशला चिडवायची संधी मिळवली होती.
     "अरे बाबांनो माझं बोलणं तर ऐका, सावंत काका हसत हसत म्हणाले."मी ह्या निमित्ताने माझ्या धाकट्या लेकासाठी वीणाला मामींकडे मागणी घालतोय.आणि ती दोघं एकमेकांना पसंत करतात हे मला अखिलेशनीच सांगितलंय. पण माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आत मेघनानी तिच्याच प्यारका इजहार कर दिया। त्याबरोबर सगळेजण इतकं हसायला लागले की...
      हसण्याच्या त्या आवाजांच्या आवर्तात आमची चारही कुटुंबे जाणीवेच्या एका वेगळ्या पुलानी जोडली गेली होती.


                                                               -  ललिता छेडा.